तीन वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरे परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:20 AM2020-10-06T01:20:44+5:302020-10-06T01:20:48+5:30
मुंबई : घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आरे परिसरात घडला. या प्रकरणी आर. पांडे (४०) नामक ...
मुंबई : घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आरे परिसरात घडला. या प्रकरणी आर. पांडे (४०) नामक व्यक्तीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरेच्या आंबावाडी परिसरात सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हा प्रकार घडला. घराबाहेर खेळत असलेल्या मुलीवर पांडेने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी स्थानिकांनी ही बाब पाहिली आणि पांडेला पकडल्याने अनर्थ टळला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवाशांनी गर्दी केली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्याला बांधून ठेवले.
आरोपीला अटक करण्यात आली असून, तो पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. त्याचे वरच्यावर मुलीच्या घरी येणे-जाणे असायचे, अशी माहिती परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
कोरोना काळात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़ आधीच कोरोनामुळे मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी व्यस्त असलेल्या पोलिसांवर अशा घटनांमुळे अधिक ताण येत आहे़ हथरस घटनेनंतर मुंबईत अशी घटना घडल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़