मुंबई/धुळे : तत्कालीन धुळे नगरपालिकेच्या मागासवर्गीय सरळसेवा भरतीची सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी सेवेतून कमी केलेल्या बबन यशवंत झोटे यांनी सोमवारी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर झोटे यांनी सोमवारी दुपारी रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत झोटे यांना रोखले व अनर्थ टाळला. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.सोमवारच्या प्रकारानंतर महापालिकेने झोटे यांची मागणी बेकायदेशीर असल्याचे पत्र मंत्रालयात उपसचिवांना पाठवले आहे़ त्यांना २००१ पासून सेवेतून कमी करण्यात आलेले आहे. महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, यासाठी झोटे यांच्यासह दोघांचा २००१ पासून पाठपुरावा सुरू आहे़ झोटे यांनी ३ एप्रिलला मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन १९८९ च्या भरती प्रक्रियेची एका महिन्यात सीआयडी चौकशी करावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़तत्कालीन धुळे नगरपालिकेने १९८९ मध्ये सरळसेवा भरती प्रक्रिया राबवली होती. त्यात बबन यशवंत झोटे व अन्य ३३ कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली होती. त्याबाबत तत्कालीन मुख्याधिकाºयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली़ न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांना अधिकार मिळाले, त्यांनी तत्कालीन नगराध्यक्षांचे आदेश रद्द ठरवले होते. तत्कालीन नगराध्यक्षांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपील केले होते. आदेश शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने मुख्याधिकाºयांनी ५ जुलै २००१ रोजी बबन झोटे, निर्मला अहिरे व लक्ष्मी वसावे यांना सेवेतून कमी केले होते. त्यानंतर न्यायालयाने झोटे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यास नगरपालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यात नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला होता.काही महिन्यांपूर्वी धुळ््यातील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारावेळी त्यांचे निधन झाले. अविनाश शेटे या तरुणानेही कृषी अधिकारी पदाची परीक्षा दिल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने मंत्रालयासमोर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हर्षल रावते या कैद्याने उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे.
सेवेतून कमी केलेल्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:39 AM