मुंबई : १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणावर कुरार पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे. महमूद अयुब हसन (२४) असे अटक तरुणाचे नाव आहे. देविका (नावात बदल) ही मुलगी मालाडच्या कुरार परिसरात राहते. हसन हादेखील त्याच परिसरात राहत असून, टेलरचे काम करतो. दोन महिन्यांपूर्वी देविकाचे आई-वडील घरी नसताना हसन तिच्या घरात बळजबरीने शिरला आणि त्याने तिच्यावर अत्याचार करून पळ काढला. पालक घरी आल्यावर देविकाने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी हसनच्या घरी जाऊन घडला प्रकार त्याच्या आई-वडिलांना सांगितला. तसेच त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करण्याची धमकीही दिली.
पोलिसांच्या भीतीने देविकाचे मुलाशी लग्न लावून देऊ, असे आश्वासन हसन कुटुंबीयांनी देविकाच्या कुटुंबीयांना दिले. मात्र, लग्न केल्याचे निव्वळ नाटक करण्यात आले. ज्यात एका मौलवीचादेखील सहभाग होता. नंतर हसन देविकाला घेऊन पालघरला गेला. जिथे एका खोलीत तिला बंद करून तिच्यावर तो रोज अत्याचार करायचा. मात्र, एक दिवस देविका त्याच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि तिने घर गाठले. आपल्यावर झालेल्या अत्याचारांबाबत तिने घरच्यांना सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. कुरार पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत हसनवर गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या. तर लग्न लावून देणाºया मौलवीलादेखील या प्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.