Join us

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, अर्धा तास पाठलाग करत पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 7:37 PM

एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसल्यावर दुसरे एटीएम फोडू लागला, पण तोही प्रयत्न फसला.

डोंबिवली: एकिकडे बंद घराची आणि दुकानांच्या शटरची कुलुप तोडून चोरटयांकडून मुद्देमाल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना शहरातील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या चोरटयाला रामनगर पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. मंगळवारी मध्यरात्री अर्धा तास हा थरार सुरू होता. मोहमद्द असगर शेख असे या चोरटयाचे नाव आहे. तो मुळचा झारखंडचा असून सध्या मुंबई, डोंगरी भागात राहतो.

डोंबिवली पुर्वेकडील टिळक रोडवर असलेले आयसीआयसीआय बँकेच्या बाहेरील एटीएम एक जण फोडत असल्याची चाहुल स्थानिक नागरीकांना लागली. त्यांनी याची माहिती कल्याण पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. तेथून ही बाब रामनगर पोलिसांना कळविण्यात आली. त्यावेळी डयुटीवर असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास सुर्यवंशी, पोलिस उपनिरिक्षक दीपक दाभाडे आणि हवालदार निवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान एटीएम फोडून त्यातील रोकड चोरण्याचा प्रयत्न फसल्याने चोरटयाने तेथून धूम ठोकली होती.

त्याने टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एटीएम फोडण्याचा देखील प्रयत्न केला, परंतू तो देखील फसला. तेथून पलायन करणारा चोरटा सुर्यवंशी आणि दाभाडे यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी लागलीच त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला. अर्धा तास हा पाठलाग सुरू होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या झडतीत स्क्रु डायव्हर सापडला आहे. त्याला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची कोठडी मिळाल्याची माहिती उपनिरिक्षक दिपक दाभाडे यांनी दिली. तो सराईत गुन्हेगार असून त्याने अजून कुठे चो-या केल्या त्याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :एटीएमडोंबिवलीमुंबई