मुंबई : आपल्यावर सुरू असलेल्या चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या एका अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना लाच देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्याच्या अंगाशी आले आहे. प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लाचखोरीच्या प्रयत्नासंदर्भात सीबीआयला पत्र लिहिले असून, सीबीआयने प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या या अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे.
अमरेश कुमार असे प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने त्याच्या सरकारी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याची खात्यांतर्गत चौकशीही सुरू आहे. त्या दरम्यान, त्याने चौकशी करणाऱ्या आपल्या वरिष्ठाला जबरदस्ती एक मिठाईचा बॉक्स देऊ केला. मात्र, त्याने तो नाकारला, परंतु तरीही अमरेश कुमार याने चौकशी संपल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या गाडीत हा बॉक्स नेऊन ठेवला. संबंधित अधिकारी घरी गेल्यावर त्याच्या सामानात त्याला हा बॉक्स पुन्हा आढळला. त्याने अमरेश कुमार याला हा बॉक्स परत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तो स्वीकारण्यास मनाई केली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्याने हा बॉक्स प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या वरिष्ठांकडे जमा केला. त्या बॉक्समध्ये एक लाख रुपये असल्याचे तपासाअंती आढळून आले. या घटनेनंतर प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरेश कुमार याच्याविरोधात सीबीआयला पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे.