मुंबई : मुंबई पोलीस आणि गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांच्या मारहाणीची प्रकरणे दिवसांगणिक वाढतच आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत असून, ही परिस्थिती सुधारण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. ‘आदर द्या आणि आदर मिळवा’ या उपक्रमाद्वारे पोलीस आणि कार्यकर्त्यांमधील सुसंवादाला ‘लोकमत’च्या माध्यमातून पाठबळ दिले जाणार आहे.काळाचौकी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या उपक्रमाला साद देत रविवारी विशेष हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये विभागातील सर्वसामान्य महिलांनी महिला पोलिसांसोबत हळदीकुंकू समारंभ साजरा केला. मुग्धा राऊत, तन्वी केरकर, संचिता पवार, जयश्री पार्टे, मंजिरी केरकर, सविता लिपारे आणि प्रमिला जाधव या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.‘लोकमत’च्या माध्यमातून सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे, अशी प्रतिक्रिया या मंडळाने व्यक्त केली. मुंबईसह राज्यातील सर्वच मंडळांनी या उपक्रमात सामील होण्याचे आवाहनही मंडळाने केले आहे. सामाजिक एकतेसाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. मात्र कार्यकर्ते आणि पोलीस यांमधील वादाचे गालबोट उत्सवाला लागले आहे. या उपक्रमामुळे पुन्हा एकदा पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उत्सव यशस्वी करतील, असा विश्वासही मंडळाने व्यक्त केला. (प्रतिनिधी)
पोलीस-कार्यकर्त्यांत सुसंवादाचा प्रयत्न
By admin | Published: September 12, 2016 3:41 AM