Join us

ऑनलाइन लेक्चरचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न,  व्याख्यानात अभ्यागतांचा अनधिकृत पणे प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 8:13 PM

विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रयत्न 

खलील गिरकर

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद असल्याने अनेकांनी ऑनलाइन माध्यमातून काम करण्यास प्राधान्य दिले आहे. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन व्याख्याने घेण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले अाहेत. त्याप्रमाणे विविध अँपच्या माध्यमातून ऑनलाइन व्याख्याने आयोजित करुन विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र या मध्ये काही अपप्रवृत्ती आपापले वाईट हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. 

 

एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्यांतर्फे दररोज विविध विषयांसाठी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मात्र काही व्याख्यानाला महाविद्यालयाच्या नियमित विद्यार्थी व विद्यार्थीनींशिवाय इतर जण उपस्थित राहत असल्याचे समोर आले आहे.  या अभ्यागतांपैकी काही जण ग्रुपवरील मुलींचे छायाचित्र पाहून, नाव पाहून त्यांना नंतर खासगीत संदेश पाठवत असल्याची चर्चा आहे त्यामुळे काही विद्यार्थिनींनी आता या ग्रुपवर ऑनलाइन व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे टाळण्याचा निर्णय घेतला आहे.  खरे पाहता,  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांनी या ऑनलाइन व्याख्यानाबाबतचा संदेश व पासवर्ड बाहेरील व्यक्तींकडे पोचवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.  खासगी माहिती उघड होत असल्याचा आरोप होत असल्याने व पर्सनल क्रमांकावर संदेश येत असल्याचे स्पष्ट झाल्याने अशा ग्रुपवर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्याबाबत फेरविचार व्हावा अथवा सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थिनी करु लागल्या आहेत.

टॅग्स :ऑनलाइनशिक्षणशिक्षण क्षेत्र