आरक्षित भूखंड बळकावण्याचा प्रयत्न

By admin | Published: April 7, 2015 05:20 AM2015-04-07T05:20:15+5:302015-04-07T05:20:15+5:30

गोवंडीच्या देवनार पालिका वसाहतीतील उद्यानासाठी आरक्षित असलेला मोकळ्या भूखंडावर भरणी घालून तो बळकावण्याचा प्रयत्न कोकण युथ क्लब

Attempts to grab reserved plots | आरक्षित भूखंड बळकावण्याचा प्रयत्न

आरक्षित भूखंड बळकावण्याचा प्रयत्न

Next

मुंबई : गोवंडीच्या देवनार पालिका वसाहतीतील उद्यानासाठी आरक्षित असलेला मोकळ्या भूखंडावर भरणी घालून तो बळकावण्याचा प्रयत्न कोकण युथ क्लब या खासगी संस्थेकडून सुरू झाल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करतात. विशेष म्हणजे हे अवैध काम पालिकेच्या एम-पूर्व विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुरू आहे.
वसाहतीतल्या पालिकेच्या स्मशानभूमीसमोरच हा भूखंड असून त्यावर २७७२ चौरस मीटर जागेत उद्यान होऊ घातले आहे. यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने काढलेल्या निविदाही पास झाल्या आहेत.
असे असताना गेल्या महिन्यात कोकण युथ क्लबने या भूखंडावर शूटिंग बॉल ‘महापौर चषक स्पर्धा’ आयोजित केली. स्पर्धेच्या नावाखाली क्लबने सुमारे ८० टक्के भूखंड भरणी घालून सपाट केला. ही भरणी घालण्यासाठी क्लबकडे पालिकेची लेखी परवानगी नव्हती. तसेच स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक असलेल्या संबंधित यंत्रणांच्या परवानग्याही त्यांनी घेतल्या नव्हत्या. स्पर्धेच्या निमित्ताने अ‍ॅड. रावराणे व क्लबने या भूखंडाचे स्वामी समर्थ मैदान असे नामकरणही केले. स्पर्धेसाठी वाटण्यात आलेल्या पत्रकांवर हेच नाव छापण्यात आले होते.स्पर्धा संपून तीन आठवडे लोटले तरी क्लबने या भूखंडाभोवती घातलेले तात्पुरते कुंपण काढलेले नाही. त्यातच गेल्या चार दिवसांपासून क्लबने उर्वरित २० टक्के भूखंडावर भरणी घालण्यास सुरुवात केली. त्याविरोधात स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींनंतर साइट व्हिजीटवर आलेले अधिकारी कारवाई न करताच निघून गेले. ‘लोकमत’ने जेव्हा या भूखंडाला भेट दिली तेव्हा तेथे भरणी सुरू होती. ते फोटो लोकमतने एम-पूर्व विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना दाखवले. तोवर या अवैध कामाबाबत ते अनभिज्ञ होते. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यातून एम-पूर्व विभागातील उद्यान साहाय्यक म्हणून नियुक्त असलेल्या अधिकारी महिलेने या भरणीसाठी क्लबला तोंडी परवानगी दिल्याची बाब उघड झाली. तेव्हा दिघावकर यांनी तत्काळ ही भरणी थांबवून मातीचे डंपर ताब्यात घेण्याचे आदेश या अधिकाऱ्याला दिले.
मुळात देवनार पालिका वसाहतीत अटलांटा व छत्रपती शिवाजी अशी दोन खेळाची मैदाने आहेत. मात्र वृद्ध, लहान मुलांना विरंगुळ्यासाठी उद्यान नाही. तसेच शेजारील स्मशानभूमी, पलीकडील डम्पिंग ग्राउंडचे प्रदूषण संतुलित राखले जाईल या हेतूने या मोकळ्या भूखंडावर उद्यान व्हावे ही येथील रहिवाशांची मागणी आहे. येथील बहुतांश सोसायट्यांनी ही मागणी लेखी स्वरूपात एम-पूर्व विभागाकडे कळवली आहे.
मात्र कोकण युथ क्लबचा उद्यानाला विरोध आहे. येथे खेळाचे मैदान व्हावे, अशी प्रतिक्रिया क्लबचे प्रमुख अ‍ॅड. विजय रावराणे यांनी लोकमतला दिली. मात्र येथे मैदान झाल्यास अ‍ॅड. रावराणेंच्या क्लबचेच उपक्रम येथे राबविले जातील. त्यात व्यावसायिक, खासगी कार्यक्रम सुरू होतील आणि त्याचा त्रास वसाहतीतील रहिवाशांना होईल, अशी भीती येथून व्यक्त होते. (प्रतिनिधी)

Web Title: Attempts to grab reserved plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.