Join us

लॉकडाऊनमध्ये शाळेकडून पालकांच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 4:07 PM

शिक्षण विभागाच्या निर्देशाना शाळेकडून केराची टोपली : पालिका शिक्षण विभागाकडून शुल्कवसुली न करण्याचे पत्रक जारी  

मुंबई : यंदा लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व मंडळाच्या शाळाना यंदा शुल्कवाढ न करण्याचे निर्देश देऊन पालकांना दिलासा दिला आहे. मात्र शाळा या ना त्या कारणाने पालकांना आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. वडाळ्याच्या सेंट जोसेफ शाळेकडून पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकाना संपूर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करून घेण्याची सक्ती करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.  सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाचे शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करू नये, असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एप्रिलमध्येच दिले होते; तरीही सेंट जोसेफ सारख्या शाळांकडून या निर्देशाना केराची टोपली दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे.राज्यात आणि देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व उद्योगधंदे आणि कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शाळांनी पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये. तसेच शिक्षण विभागाने जरी केलेल्या निर्णयानुसार पालकांच्या सुविधेसाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ साठीचे शुल्क एकाच वेळी न घेता मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने जमा करण्याचा पर्याय पालकांना उपलब्ध करून द्यावाअसे शाळांना सांगण्यात आले आहे. किंवा  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी काही शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसल्यास, त्यासाठीचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीत (ईपीटीए) ठराव करून त्या प्रमाणात शुल्क कमी करावे असे सुचविले आहे. मात्र सेंट जोसेफ शाळेकडून पाचवीच्या वर्गातील प्रवेशासाठी एकरकमी शुल्क जमा करण्याचे मेसेज, ई मेल पालकांना पाठविण्यात आले आहेत.या सबंधित तक्रारी आल्यानंतर युवसेनेकडून उपसंचालकाना कारवाई करण्याची मागणी केली. उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सबंधित शाळेला जाब विचारला असता पालकांना जबरदस्ती करण्यात आली नाही, ज्यांना शक्य असेल त्यांनीच शुल्क भरावे असे नवीन ई मेल पालकांना करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी उपसंचालकांना दिली असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी संगितले. शिक्षण विभागाचे आदेश असतानाही शाळांकडून पालकांची पिळवणूक करण्याचा हा प्रकार आहे. यासाठी शासन आदेश मान्य न करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई आवश्यक असल्याचे मत युवसेना पालिका समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांसोबत घडलेली ही घटना पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसोबत होण्याची शक्यता असल्याने पालिका शिक्षणाधिकारी यानाही याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी युवसेनेने केली असल्याची माहिती सावंत यांनी दिली. कोरोनाच्या काळात पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना व शिक्षण विभागाचे आदेश असताना शाळांनी अशी लुट थांबविली पाहिजे अशी प्रतिक्रिया युवसेना सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले. 

 

लॉकडाऊनच्या कालावधीत पालकांकडून कोणत्याही प्रकारची शुल्कवसुली केली जाऊ नये अशा सूचना सर्व व्यवस्थापनाच्या व मंडळाच्या मनपा खाजगी प्राथमिक , अनुदानित , विना अनुदानित शाळांना परिपत्रक काढून निर्गमित केल्या आहेत. सर्व शाळांनी शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करावे ही सूचना देण्यात आली आहे.- महेश पालकर , शिक्षणाधिकारी , मनपा , मुंबई 

टॅग्स :शाळाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस