अस्तंगत होणारी परंपरा टिकवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:33 AM2018-06-11T04:33:48+5:302018-06-11T04:33:48+5:30
सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम नागरिक महिनाभर रोजे ठेवतात. रोजा ठेवण्यापूर्वी पहाटे सेहरी करणे व सूर्यास्तानंतर इफ्तार करणे बंधनकारक आहे.
- खलील गिरकर
मुंबई - सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम नागरिक महिनाभर रोजे ठेवतात. रोजा ठेवण्यापूर्वी पहाटे सेहरी करणे व सूर्यास्तानंतर इफ्तार करणे बंधनकारक आहे. सेहरी करण्यासाठी पहाटे ३ ते ४ वाजता उठावे लागते. अनेकदा रात्री उशिरा झोपल्यानंतर पहाटे उठणे अशक्य होते. सेहरीसाठी झोपेतून जागे करण्यासाठी पहाटेच्या वेळी मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये जाऊन भोंगा वाजवून व धार्मिक गाणी गाऊन नागरिकांना उठवण्याचे काम काही व्यक्तींमार्फत केले जात आहे.
मुंब्रा-कौसा भागात हे काम मोहम्मद हुसैन व सलीम शेख हे गेली काही वर्षे करत आहेत. मूळचे हैदराबादचे असलेले मोहम्मद हुसैन हे केवळ या कामासाठी म्हणून रमजान महिन्यात मुंब्रामध्ये येतात. त्यांचे वडील व आजोबाही हे काम करत होते. मुंब्रा परिसरात एक रूम भाड्याने घेऊन ते तिथे राहतात व रात्रीची तरावीहची विशेष नमाज अदा केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन ते मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजेपर्यंत तेथील गल्लीबोळात फिरून भोंगा वाजवून व गाणी गाऊन नागरिकांना उठवण्याचे काम करतात.
कळवा येथील सलीम शेख हे केवळ आवड व धार्मिक, सामाजिक कार्यात आपला सहभाग असावा, या हेतूने हे काम करतात. ते कळवा येथे वर्षभर मजुरीचे काम करतात. मात्र, रमजानमध्ये रात्री मुंब्रा येथे येतात व रात्री थोडा वेळ मशिदीमध्ये आराम करून सेहरीसाठी नागरिकांना जागे करण्याच्या कामाला जातात. या कामासाठी कोणाकडेही आर्थिक मदतीसाठी ते हात पसरत नाहीत. मुस्लीम समाजातील काही नागरिक स्वखुशीने त्यांना काही रक्कम देतात. पूर्वीही मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये सेहरीसाठी उठवण्याचे काम हीच मंडळी करत असत. मात्र, आता नागरिकांची लाइफस्टाइल बदलल्याने, अलार्म लावून उठणाऱ्या नागरिकांमुळे, त्याचप्रमाणे रमजान काळात रात्रभर सुरू असलेल्या बाजारपेठांमुळे अनेक ठिकाणी युवावर्ग रात्रभर जागा असतो. हा
वर्ग सेहरी केल्यानंतर झोपण्यास जातो.