सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न - मेधा पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:01 AM2019-11-26T04:01:39+5:302019-11-26T04:01:53+5:30

आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे.

 Attempts to target social workers - Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न - मेधा पाटकर

सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न - मेधा पाटकर

Next

मुंबई : आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. पासपोर्ट नूतनीकरण करताना प्रलंबित खटल्यांची माहिती दडवल्याने पासपोर्ट जप्त करण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मुंबई पासपोर्ट कार्यालयातर्फे नोटीस बजावण्यात आली होती. त्याचे उत्तर देताना पाटकर यांनी पासपोर्ट नूतनीकरण करताना आपल्याविरोधात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली होती.
पासपोर्ट कार्यालयाच्या दाव्याप्रमाणे कोणत्याही प्रलंबित खटल्याची माहिती आपण लपवलेली नाही. ज्या गुन्ह्यांची माहिती होती ती पूर्वीच दिली होती. ३० मार्च २०१७ रोजी पाटकर यांनी पासपोर्ट नूतनीकरण केले होते. पासपोर्ट विभागाच्या नोटिसीप्रमाणे मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यात पाटकर यांच्याविरोधात ५ गुन्हे, बडवानीमध्ये ३ तर अलीराजपूरमध्ये एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. पासपोर्ट अधिनियम १९६७ च्या कलम १० (३) अन्वये पासपोर्ट जप्त करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, पाटकर यांच्या म्हणण्यानुसार बडवानी जिल्ह्यातील मूकरॅलीबाबतचा गुन्हा आॅगस्ट २०१७मध्ये नोंदवण्यात आला. तर, इतर गुन्ह्यांतून त्यांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
पासपोर्ट कार्यालयाची नोटीस म्हणजे सरकारला प्रश्न विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार आहे. पासपोर्ट कार्यालयाला आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रांपैकी जी कागदपत्रे आपल्याजवळ होती ती देण्यात आली आहेत, असे पाटकर यांनी स्पष्ट केले. या प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

Web Title:  Attempts to target social workers - Medha Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.