मनीषा म्हात्रे, मुंबई : पैसे पाठवल्याचा बनावट संदेश पाठवून, चुकून जास्तीचे पैसे आल्याचा बनाव करायचा. पुढे, उर्वरित पैसे परत पाठविण्यास भाग पाडून नागरिकांच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारत असल्याची धक्कादायक बाब डीबी मार्ग पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे. डी. बी. मार्ग पोलिसांनी राजस्थानमधून झफर खान (२३) अटक केली आहे. त्याने अनेकांना गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. नागरिकांनीही, असे संदेश आल्यास वेळीच सतर्क होण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तक्रारदार हे अकाऊंटंट म्हणून टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल कंपनीत नोकरीला आहे. १३ जानेवारी रोजी एक क्लायंट बंगळुरूवरून मुंबईत येत असल्याने त्यांच्या राहण्यासाठी गुगलवरून हॉटेल बुक केला. कॉलधारकाने सांगितल्याप्रमाणे १६ हजार ५०० रुपये दोन टप्प्यात पाठवले. मात्र कॉलधारकाने रक्कम एकत्रित पाठवल्यानंतर बुकिंग होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, तक्रारदार यांनी पुन्हा पैसे पाठवले. आरोपीने बोलण्यात गुंतवून दोन वेळा पैसे पाठविण्यास सांगितले. यामध्ये ५० हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. बुकिंगबाबत कंपनीला अधिकृत मेल न आल्याने त्यांना संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डी.बी. मार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता.
एसएमएसमधून उलगडा :
आराेपी खानच्या मोबाइलमध्ये २० ते ३० एसएमएस मिळाले. बँकेच्या अलर्ट संदेशाप्रमाणे होते. जे वेगवेगळ्या नागरिकांना पाठविण्यात आले होते. त्यामध्ये नंबर दिसत नव्हता. बँकेकडून तो मेसेज आल्याचे वाटत होते. यामध्ये २० ते ६० हजार रुपयांचा समावेश होता.
अशी करायचे फसवणूक :
तुमच्या वडीलांचे पैसे पाठवायचे होते? किंवा अन्य कारणाने पैसे पाठवायचे असल्याचे सांगून जास्तीची रक्कम पाठविण्याचा संदेश पाठवायचा. पुढे, चुकून जास्तीचे पैसे आल्याचे सांगून पैसे परत पाठविण्यास सांगायचे. पैसे पाठविण्यास कोणी विरोध करताच पोलिसात तक्रार करण्याची भीती दाखवून पैसे उकळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय असून, पोलीस अधिक तपास करत आहे.
एमपीचे बँक खाते :
१) ज्या खात्यात पैसे गेले ते मध्य प्रदेशचे (एमपी) बँक खाते निघाले. तसेच यूपीच्या एटीएममधून पैसे काढले.
२) मध्य प्रदेश आणि यूपी बॉर्डरवर असलेल्या राजस्थान भरतपूरमधून हा कॉल आल्याचे समजताच पथकाने भरतपूर गाठले.
३) दहा दिवस तळ ठोकल्यानंतर कॉल आलेल्या ठिकाणी धाड टाकून खानला अटक केली.
४) खान हा बारावी पास असून, काम करत नाही. खानचा भाऊ करीम हे पैसे खात्यातून काढत होता.
प्ले स्टोरची मदत :
या टोळीला प्ले स्टोअरवरून विविध ॲपद्वारे मोबाईल क्रमांक मिळत होते. या मोबाईल क्रमांकाद्वारे सावज जाळ्यात येताच त्यांची फसवणूक करत होते. या अँप बाबत पोलीस अधिक तपास करत आहे.
असे मिळायचे कमिशन :
१) १५ टक्के ज्या बँक खात्यात पैसे जायचे त्या खातेदाराला
२) ५ टक्के पैसे काढणाऱ्याला
३) ८० टक्के म्होरक्याला
सायबर क्राईमचे ३६८ गुन्हे :
गेल्या महिनाभरात सायबर संबंधित ३६८ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहे. यापैकी अवघ्या ३८ गुन्ह्यांची उकल करत ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसएमएस, एमएमएसचे २० गुन्हे नोंद आहे. त्यापैकी सहा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड फसवणुकीचे ९१ गुन्हे नोंद असून त्यापैकी ८ गुन्ह्यात ९ जणांना अटक करण्यात आली.
आरोपीने गुन्ह्यासाठी बल्क एसएमएस सर्व्हिसचा आधार घेतला होता. यामध्ये संदेश पाठविणाऱ्याचे नाव ठेवण्याची मुभा होती. याचाच फायदा घेत ही टोळी बनावट संदेश पाठवत अनेकांची फसवणूक करत होती.