मुंबई : कुणबी जातीच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी सुनावणीस उपस्थित राहण्याची नोटीस कांदिवली पूर्वच्या वाॅर्ड क्र.२८चे शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंडारे यांना जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे कार्यालयाकडून बजाविण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना ४ डिसेंबर रोजी समितीसमोर उभे राहावे लागणार असून याआधी कारणे दाखवा नोटीसही त्यांना बजाविण्यात आली होती.
नगरसेवक हुंडारे यांनी तीन महिन्यांपूर्वीच वाॅर्ड क्र.२८चे नवनियुक्त नगरसेवक म्हणून पदभार स्वीकारला. मात्र त्यांच्या जातीचा दाव्याच्या वैधतेबाबत समितीची खात्री पटलेली नसल्याने, त्यांना (२००१चा महाराष्ट्र अधिनियमन क्र.२३) कलम ८ प्रमाणे दावा सिद्ध करावा लागणार आहे. त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीविषयी एका तक्रारदाराने आक्षेप घेतल्याने हुंडारे यांना जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस २३ ऑक्टोबर रोजी बजाविण्यात आली होती. त्यासाठी हुंडारे उपस्थित झाले होते. परंतु त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांबाबत समितीने मूल्यमापन करत काही आक्षेप नोंदविले आहेत. याबाबत खुलासा करण्यासाठी त्यांनी हजर राहणे अनिवार्य असेल. हुंडारे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.