मुंबई : अकरावी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया आॅक्टोबर उजाडला, तरी संपत नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या एकूण सात फेऱ्या होऊनही विद्यार्थी प्रवेशासाठी उपसंचालक कार्यालयाच्या फेºया मारताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेश घेतला नाही किंवा अकरावी प्रवेशासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १५ ते १७ आॅक्टोबर रोजी उपसंचालक कार्यालयात उपस्थित राहावे, अशा सूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. अद्याप दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आणि एटीकेटी सवलत मिळालेले अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आठवी फेरी घेण्याची चाचपणी उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात येत होती. तसा प्रस्तावही शिक्षण विभागाला देण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, आता आठव्या फेरीऐवजी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयात उपस्थितीसाठी आवाहन करण्यात आले आहे. यामुळे एटीकेटी आणि पुनर्परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तरीही आठवी फेरी होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम असून त्याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.
अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पहिले सत्र संपत आले आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश देण्यात येणाºया विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या तासिका कधी आणि केव्हा आयोजित करायच्या, असा प्रश्न महाविद्यालयीन प्राचार्यांपुढे उभा राहिला आहे. आॅनलाइन प्रवेश समिती नियामक प्राधिकरणाने प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा आम्हाला अशाच समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याची हतबलता प्राचार्यांसह शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.आठव्या फेरीबाबत संभ्रम कायमअकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयात उपस्थितीसाठी आवाहन करण्यात आले आहे. यामुळे एटीकेटी आणि पुनर्परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे प्रवेशाची आठवी फेरी होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम असून, त्याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.