Join us

स्टंटबाजीसाठी गाड्या पळवणारी दुकली अटकेत

By admin | Published: April 16, 2017 2:35 AM

वाहनचोर टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली आहे. त्यात अल्पवयीन मुलाचाही समावेश असून, त्यांच्याकडून चोरीच्या २१ दुचाकी व एक कार

नवी मुंबई : वाहनचोर टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली आहे. त्यात अल्पवयीन मुलाचाही समावेश असून, त्यांच्याकडून चोरीच्या २१ दुचाकी व एक कार जप्त करण्यात आली आहे. त्यांनी दुचाकींचा वापर स्टंटबाजीसाठी करून, कार उत्तर प्रदेशमध्ये विकल्याचे तपासात समोर आले आहे.शहरातल्या वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. या दरम्यान, भिवंडीमधील काही संशयित तरुणांची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी विशेष पथक तयार केले. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी येथे सापळा रचून, एका संशयित अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो सराईत गुन्हेगार असून, वाहनचोरीची टोळी असल्याचे समोर आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अली अहमद जिब्रिल शाह (३८) याला अटक करण्यात आली. मात्र, त्यांचे इतर तीन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.अटक केलेल्या दोघांकडून स्क्रूड्रायवर, कानस, पकड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दुचाकीचे हँडल लॉक तोडून अथवा बनावट चावी वापरून ते वाहनांची चोरी करायचे. त्यांनी शेकडो वाहने चोरल्याची शक्यता असून, त्यापैकी २१ दुचाकी व एक कार, असा ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दुचाकी चोरल्यानंतर त्यात बदल करून मुंबईत मरिन ड्राइव्ह, तसेच इतर ठिकाणी स्टंटबाजीसाठी ते त्यांचा वापर करत असत. रबाळे, वाशी, एपीएमसी, पनवेल, खारघर, उरण, पेण, निजामपुरा परिसरातून त्यांनी ही वाहने चोरली होती. स्टंटबाजीनंतर चोरलेल्या काही कार त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विकल्याचेही तपासात समोर आले आहे. शिवाय, सगळे व्यसनी असल्यामुळे चोरीचे वाहन विकल्यानंतर आलेल्या पैशांतून ते मौजमस्ती करायचे. (प्रतिनिधी)