Join us

माथाडी मेळाव्याकडे लागले सर्वांचे लक्ष

By admin | Published: September 23, 2014 2:00 AM

राज्यात विधानसभा निवडणूक एकाच दिवशी होणार असल्यामुळे माथाडी कामगारांच्या मतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे

नवी मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक एकाच दिवशी होणार असल्यामुळे माथाडी कामगारांच्या मतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील जवळपास ८ मतदारसंघांत कामगारांची मते निर्णायक ठरणार आहेत. यामुळे २५ सप्टेंबरला होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुका आल्या की माथाडी कामगारांना विशेष महत्त्व प्राप्त होत असते. बहुतांश वेळा निवडणुका या दिवाळी किंवा मेमध्ये होत असतात. माथाडी संघटनेचे दोन मोठे मेळावे दरवर्षी मे महिन्यात व २५ सप्टेंबरला होत असतात. यामुळे अनेकदा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून बहुतांश सर्व प्रमुख नेते या मेळाव्यास हजेरी लावतात. सातारा - जावली, पाटण, कोरेगाव, कराड, शिराळा, भोर, ऐरोली व बेलापूर मतदारसंघांमध्ये कामगारांची संख्या मोठी आहे. एकाच दिवशी मतदान असल्याने ग्रामीण भागातील नेते कामगारांना परिवारासह गावी येण्याचे आवाहन करीत आहेत. मुंबईतही उमेदवारांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. माथाडींचे नेते शशिकांत शिंदेही प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांच्या कोरेगाव मतदारसंघात प्रचारासाठी बोलावणार आहेत. मतदार गावी गेल्यास नवी मुंबईतील पक्षाच्या उमेदवारांना फटका बसेल.त्यामुळे स्थलांतर रोखण्याचे आव्हान येथील नेत्यांसमोर आहे. २५ सप्टेंबरच्या मेळाव्यास माथाडींशी संंबंधित मतदारसंघातील बहुतांश सर्व उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)