मुंबईतील शाळांमध्ये ४२% विद्यार्थ्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:05 AM2022-01-25T08:05:55+5:302022-01-25T08:06:16+5:30
९० टक्क्यांहून अधिक शाळा अनलॉक : शिक्षकांची हजेरीही उल्लेखनीय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने डिसेंबरमध्ये बंद झालेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा सुरु झाल्या. मुंबईतील तब्बल ३ हजार ८५० शाळा पुन्हा अनलॉक झाल्या. मुंबईतील पहिली ते बारावीच्या तब्बल ९० टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
मुंबईमध्ये पालिका आणि उपसंचालक कार्यालयांतर्गत पहिली ते बारावीमध्ये एकूण १६ लाख ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी ४१ टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी ऑफलाईन उपस्थिती लावली आहे. यामध्ये खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांहून अधिक होती तर पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही केवळ २९ टक्के दिसून आली. या उपस्थितीमध्ये हळूहळू वाढ होत जाईल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईसह राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून १५ फेब्रुवारीपर्यंत सरकारने सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ डिसेंबर रोजीच सुरु झालेल्या मुंबईतील शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या.
२ लाख ९७ हजार ४६७ पालकांचे संमतीपत्र
२४ जानेवारीपासून स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जारी केल्यावर मुंबईतील शाळाही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे मुंबईतील ९० टक्क्यांहून अधिक शाळांनी वर्ग सुरु करून प्रतिसाद दिला. दरम्यान उर्वरित काही खासगी व्यवस्थापन आणि केंद्रीय मंडळाच्या शाळा येत्या २ ते ३ दिवसांत सुरु होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शाळा सुरु करण्याच्या निर्णयानंतर पहिल्याच दिवशी मुंबईतील शिक्षकांची उपस्थिती ही उल्लेखनीय होती. उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकांची एकूण उपस्थिती ही जवळपास ९१ टक्के तर पालिका शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती ही ९७ टक्के होती.
nजे विद्यार्थी अद्यापही ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि प्रत्यक्ष शाळेत हजर नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षक ऑनलाईन शिकवत आहेत. पालिका शाळांमध्ये एकूण २ लाख ९७ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी शाळेतील
उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्र दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. हळूहळू उपस्थिती वाढून विद्यार्थी पुन्हा प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव घेतील अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.
पालिका, उपसंचालक कार्यालयांची आकडेवारी
एकूण शाळा २२६९ १७७४
सुरु झालेल्या शाळा २११९ १७३१
एकूण विद्यार्थी ६५२५१० ९८२८६०
उपस्थित विद्यार्थी १९३६४० ५२६४५२
एकूण शिक्षक -मुख्याध्यापक १८०६७ ३४४८६
उपस्थित शिक्षक-मुख्याध्यापक १७६४३ ३१३५३
एकूण शिक्षकेतर कर्मचारी ४३१४ -
उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी ४१७३ -