मुंबई - भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गेल्या आठवड्यात मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अमित शाह यांनी भाजपाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी पालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या सुस्तावलेपणाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच पक्षाच्या मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वासह पदाधिकाऱ्यांची हजेरी घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजपाचे मुंबईतील पदाधिकारी हे सुखासीन अवस्थेत असल्याचे सांगत अमित शाह यांनी भाजपाच्या नेतृत्वाला भ्रमात राहू नका, असा सल्ला दिला.
अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेतलं होतं. तसेच काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला होता. तसेच या निवडणुकीसाठी नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते.
त्यावेळी भाषणानंतर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तुमच्या भाषणामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अमित शाह यांनी आशिष शेलार यांना मुंबईतील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुशेगात अवस्थेत असल्याचे सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये भाजपाला १३४ नाही तर १५० जागा जिंकायच्या आहेत. असे सांगत अमित शाह यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोरील टार्गेट वाढवले. तसेच मुंबईत शिंदे गटाशी युती होईल, असे संकेतही त्यांनी दिले. मात्र आपल्या एका दौऱ्यातच अमित शाह यांनी भाजपाच्या पूर्वतयारीचा आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनोवस्थेचा पुरेपूर आढावा घेतल्याने येत्या काळात मुंबईतील भाजपा नेत्यांसमोरील आव्हान वाढणार आहे.