मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आहे. शुक्रवारी गिरगाव येथील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करून दीडशे लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आयोजित केल्याचे समाेर आले. याची गंभीर दखल घेत पालिकेने संबंधितांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने २३ एप्रिलपासून राज्य सरकारने मुंबईत कडक निर्बंध लागू केले आहेत. तरीही लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत असून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पहायला मिळत हाेते. त्यामुळे नवीन नियमावलीत लग्नसोहळ्यात २५ पाहुण्यांचीच उपस्थिती तसेच विवाह सोहळ्यासाठी दोन तासांचाच अवधी देण्यात आला आहे. तरीही दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या संस्कृती हाॅलमध्ये शुक्रवारी नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाला मिळाली.
त्यानुसार विभाग कार्यालयाच्या चमूने तेथे धाड टाकली. त्यावेळी तेथे सुमारे १५० व्यक्ती उपस्थित असल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात या लग्नसाेहळ्यास दिवसभर ४०० च्या आसपास लाेक येऊन गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपस्थितांमध्ये सोशल डिस्टन्सिंगही राखण्यात आले नव्हते. अनेकांनी मास्कही लावला नव्हता. संबंधित हॉलचालकांना ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच हाॅलचालक व संबंधित लग्नसोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती डी विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.