अस्वच्छ शाळांत शिक्षकांची होतेय जीव मुठीत घेऊन उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 01:26 AM2020-11-05T01:26:41+5:302020-11-05T01:27:03+5:30
teachers : शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी शाळेचे २ ते ३ वेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे शिक्षण विभागाने सूचनांमध्ये स्पष्ट केलेले असताना अद्याप कितीतरी अनुदानित महापालिका आणि संस्थाचालकांनी यासंदर्भात कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे.
मुंबई : मिशन बीगिन अगेन अंतर्गत अनलॉककडे आणखी एक पाऊल म्हणून शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५०% उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र शाळांमधील शिक्षक वेतनकपातीची धास्ती असल्यामुळे जीव मुठीत घेऊन शाळांत उपस्थिती दर्शवित आहेत. त्याचबरोबर अनेक महापालिकांतील शाळांनी अद्याप शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची स्वच्छता, सॅनिटायझेशनच केले नसल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत.
शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी शाळेचे २ ते ३ वेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे शिक्षण विभागाने सूचनांमध्ये स्पष्ट केलेले असताना अद्याप कितीतरी अनुदानित महापालिका आणि संस्थाचालकांनी यासंदर्भात कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे.
शाळांमध्ये हात धुण्यासाठी हॅण्डवाॅशची सोय नाही. शिक्षण विभागाने सूचनांप्रमाणे स्वच्छतेविषयी उपाययोजनांची येत्या १५ दिवसांत पूर्तता करण्याच्या सूचना द्याव्यात आणि मगच शिक्षकांना बोलवावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
अस्पष्ट आणि संभ्रमात टाकणारा निर्णय
प्रतिबंधात्मक वा कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी नेमके काय करायचे? हे सर्व अस्पष्ट असल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली. विशेष म्हणजे इतर अंमलबजावणी करण्यासाठी जो निधी लागणार आहे, त्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जोपर्यंत शासनाचे स्पष्ट आदेश निर्गमित होत नाहीत, तोपर्यंत परिस्थितीत कोणताही बदल न करण्याचा निर्णय मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
काही शाळांच्या समस्या
घाटकोपर येथे धनजी देवशी शाळेत कोविड तपासणी होत असून, तेथे कोविड रुग्णांची ये - जा सुरू असते. तेथेही शाळेत शिक्षकांना येऊन बसण्याची सक्ती केली आहे. त्याऐवजी घरून काम करू द्यावे, अशी मागणी शिक्षक करीत आहेत.
भायखळा येथील शाळेत कोरोना रुग्ण आहेत, त्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या शाळेत नेऊन बसविण्यात आले आहे. त्यापेक्षा घरीच राहील्यास त्यांच्या जीवितास तरी धोका निर्माण होणार नाही, अशा प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.