व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा अटकेत
By Admin | Published: April 13, 2015 02:47 AM2015-04-13T02:47:22+5:302015-04-13T02:47:22+5:30
ल्डरकडे खंडणी मागणाऱ्याला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. ठार मारण्याची धमकी देऊन त्याने २ कोटी रुपये उकळले असून,
नवी मुंबई : बिल्डरकडे खंडणी मागणाऱ्याला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. ठार मारण्याची धमकी देऊन त्याने २ कोटी रुपये उकळले असून, शुक्रवारी २५ हजारांची खंडणी घेण्यासाठी तो आला असता पोलिसांनी त्याला पकडले.
मिथुन पाटील (३२) असे या खंडणीखोराचे नाव असून, तो कांदेलपाडा पेण येथील राहणारा आहे. सीबीडी येथील अॅग्रो इंजिनीअर्स या कंपनीचे पेण येथे विकासकाम सुरू आहे. त्याचे विकासक विनीत मल्होत्रा यांना तो खंडणीसाठी सतत धमकावत होता. २००९पासून आजतागायत १ कोटी ८६ लाख २६ हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. शुक्रवारी पुन्हा तो २५ हजार रुपयांची खंडणी मागत होता. धमक्यांना कंटाळून मल्होत्रा यांनी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्याकडे तक्रार केलेली. त्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी सापळा रचला होता. पाटील खंडणी घेण्यासाठी सीबीडी येथे आला असता त्याला अटक करण्यात आली. कंपनीचे मुख्य कार्यालय सीबीडी येथे आहे. पेण येथे सुरू असलेले काम सुरू ठेवण्यासाठी मिथुन पाटील खंडणी मागायचा. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही तो वारंवार द्यायचा. त्यानुसार गेल्या सहा वर्षांत त्याने कंपनीच्या सीबीडी येथील कार्यालयातून चेकद्वारे सुमारे २ कोटी रुपयांची खंडणी उकळली आहे. हे सर्व चेक त्याने वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये वटवले आहेत. या प्रकारात त्याच्या इतरही साथीदारांचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)