शाळेजवळ गांजा विकणारे अटकेत
By admin | Published: June 3, 2017 06:49 AM2017-06-03T06:49:05+5:302017-06-03T06:49:05+5:30
वर्सोवा येथील एका शाळा परिसराजवळ गांजा विक्री करणाऱ्या दुकलीला वर्सोवा येथून गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांनी हा गांजा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: वर्सोवा येथील एका शाळा परिसराजवळ गांजा विक्री करणाऱ्या दुकलीला वर्सोवा येथून गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांनी हा गांजा कोठून व कसा आणला, याचा शोध पोलीस घेत आहेत. विजय मिश्रा आणि संतोषकुमार बरलवाल अशी अटक आरोपींची नावे आहेत.
वर्सोवा परिसरात काही जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार, आम्ही ‘वर्सोवा वेल्फेअर शाळे’च्या मागे असलेल्या मोकळ््या मैदानात बुधवारी दुपारी १च्या सुमारास सापळा रचला. त्या वेळी दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. तेव्हा पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याची झडती घेतली. त्यांच्या झडतीत जवळपास २१ किलो ५०० ग्रॅम गांजा सापडल्याचे, वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी सांगितले. दोघेही हैदराबादवरून रेल्वेने मुंबईत आल्याचे चौकशीत उघड झाल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार, त्यांनी हे अमली पदार्थ कुठून आणि कोणाला देण्यासाठी आणले, याची चौकशी पोलीस करत आहेत.
परिसरातलगत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही ते कमी पैशांत गांजा विक्री करत असल्याचा संशयही वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस त्यांच्याकडून कसून चौकशी करत आहेत, तसेच या प्रकरणात आणखीन काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यांच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.