दिल्ली संमेलनात सहभागी झालेले महाराष्ट्रातील भाविक क्वारंटाइनमध्ये; संपर्कात आलेल्यांचाही युद्धपातळीवर शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:30 AM2020-04-02T01:30:25+5:302020-04-02T06:30:47+5:30
महाराष्ट्रातूनही या संमेलनात काही भाविक सहभागी झाले होते. त्या सर्वांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.
मुंबई : दिल्लीत निजामुद्दीन येथे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या तबलिगी जमातच्या संमेलनातून अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातूनही या संमेलनात काही भाविक सहभागी झाले होते. त्या सर्वांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या सहवासात आलेल्यांनाही शोधण्याचेही काम सुरू आहे.
मुंबई : ५० हून अधिक जणांची हजेरी
मुंबईहून ५० हून अधिक जण कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याची एक यादी मुंबई पोलिसांकडे असून त्यानुसार संबंधित व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत. यात वांद्रे येथील १२ आणि सांताक्रुझ येथील ३२ जणांचा समावेश असल्याचे समजते.
ठाणे : १६१ जणांचा संमेलनात सहभाग
ठाणे जिल्ह्यात १६१ जण परत आल्याची बाब पुढे आली आहे. त्या १६१ जणांना १३९ ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. ते १६१ जण ठाणे शहर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुंब्रा, बदलापूर, घोडबंदर रोड, वसई या परिसरातील नागरिक आहेत. त्यांचा शोध घेतला असून त्यांच्या नावापासून पत्ता आणि मोबाईल क्रमांक याची माहिती उपलब्ध आहे. अनेकांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली.
नागपूर : ५४ जण क्वारंटाइनमध्ये
नागपुरातील सुमारे ७० जणांचा कार्यक्रमात समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ५४ जणांचा शोध लागला असून, त्यांना आमदार निवास येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सर्वांची तपासणी सुरू आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
यवतमाळ : ५ जण क्वारंटाइनमध्ये
जिल्ह्यातील १२ भाविक संमेलनात सहभागी झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. प्रशासनाने १२ व्यक्तींची शोधाशोध केली. त्यातील पाच जण परत आल्याचे आढळून आले. त्यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
चंद्रपूर : दोघांचा संमेलनात सहभाग
जिल्ह्यातील दोघेजण सहभागी झाले होते, अशी माहिती चंद्रपूर पोलिसांना प्राप्त झाली आहे. यातील एक जण नागपूर जिल्ह्यातील कामटी येथे आहे. तर दुसरा संपर्कात नसून त्याचा शोध पोलीस घेत आहेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
गोंदिया : सर्व १९ जणांचा शोध सुरू
तबलिगी जमातीचे जिल्ह्यातील १९ जण दिल्लीत गेले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र ते निजामुद्दीनहून अद्याप जिल्ह्यात परतले नसल्याची माहिती आहे. त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करुन तपासणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्धा : आठपैकी एक व्यक्ती गावी परतला
जिल्ह्यातील आठ जण सहभागी झाले होते. त्यापैकी एक व्यक्ती आर्वीत पोहोचला असून सात व्यक्ती अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नसल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्यक्ती आणि त्याच्या परिवारातील सदस्यांची आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांना कोणतीही बाधा नसून खबरदारी म्हणून सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. इतर सात व्यक्ती दिल्ली, आग्रा, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.
अकोला : चार जण विलगीकरण कक्षात
जिल्ह्यातील १० जण संमेलनात सहभागी झाले होते. कोरोना संशयित म्हणून या सर्वांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला असून, यापैकी केवळ चार जण अकोल्यात परतले असून, त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. संपर्क झालेल्या व्यक्तींना तपासणीसाठी सर्वोपचारच्या ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये दाखल केले आहे.
परभणी : तिघे जण संमेलनात सहभागी
शहरातील तीन जण सहभागी झाले होते. त्यांची मंगळवारी जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तिघांना जिल्हा रुग्णालयात विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तिघांच्या संपर्कात ५ जण आले असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
भंडारा : दोन व्यक्ती क्वारंटाइन
कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील दोन व्यक्ती आणि निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून त्या दरम्यान प्रवास करणाºया जिल्ह्यातील सहा व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मर्काझमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोघांना यापूर्वीच होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. लाखनी तालुक्यातील २० जण हरिद्वार येथे यात्रेला गेले होते. ते निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून आपल्या गावी २२ मार्चला परत आले. त्यापैकी सहा जणांना सर्दी असल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
नाशिक : ३२ जणांचा सहभाग
सोहळ्याचे नाशिक कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे. जिल्ह्यातील तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे. शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाची चार पथके पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवत आहेत.
अहमदनगर : ३४ जणांचा सहभाग
जिल्ह्यातील ३४ जण कार्यक्रमात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी २९ जण परदेशी नागरिक आहेत. या परदेशी नागरिकांपैकी १४ जणांची स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त असून त्यातील दोघे कोरोनाबाधित आहेत. उर्वरीत व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. परदेशी व्यक्तींना संगमनेर, राहुरी, जामखेड आणि नेवासा येथून ताब्यात घेण्यात आले होते.
जळगाव : १३ जणांचा समावेश
जिल्ह्यातील १३ जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या १३ पैकी सात जण जळगाव शहरातील आहेत. त्यांना कोरोनाची लागण नसल्याचा अहवाल आला आहे. १३ पैकी २ जण दिल्ली येथेच नोकरीला आहेत तर दोन जण नाशिक येथे गेले आहेत. भुसावळ शहरात २ जण आहे.
उस्मानाबाद : ‘ते’ चौघे दिल्लीतच
जिल्ह्यातील ७ जणांचा प्रशासनाने शोध घेतला आहे़ यापैकी चौघे दिल्लीतच असून, जिल्ह्यात परतलेल्या तिघांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे़ मात्र, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
हिंगोली : एक रुग्णालयात, ११ दिल्लीत
मर्काझला गेलेल्या एकासह त्याच्या संपर्कातील अन्य एकास येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल केले. तर उर्वरित ११ जण अजून दिल्लीतच असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
लातूर : एकही रुग्ण नाही
जिल्ह्यामध्ये दिल्ली संदर्भाने एकही रुग्ण नाही. उदगीर येथे आढळून आलेला रुग्ण दिल्लीहून प्रवास करून आलेला आहे. मात्र त्याचा दिल्लीतील कार्यक्रमाशी संबंध नाही, असे जिल्हाधिकार जी. श्रीकांत यांनी बुधवारी स्पष्ट केले.
पुणे : विभागातून १८२ जण सहभागी
तबलिगी जमातच्या मेळाव्यात गेलेल्या पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्राप्त झाली आहे. त्यातील १०६ जणांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरितांचा शोध गतीने सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी दिली. पुणे जिल्ह्यातील १३६, सातारा जिल्ह्यातील ५, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ व कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. पुण्यातील ५१ जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे.
पिंपरी चिंचवड : १४ जणांचे नमुने पाठविले
शहरातील ३२ जण कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यापैकी १४ जणांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. उर्वरित १८ जणांचा शोध सुरू आहे.
औरंगाबाद : ९ भाविक शोधले
नऊ भाविकांचा शोध लावण्यात महापालिका आणि पोलिसांना यश आले आहे. त्यांना बुधवारी चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी नेण्यात आले होते. सर्व भाविकांची प्रकृती ठणठणीत असून त्यांच्यामध्ये कोरोना आजाराची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.
बीड : कुणाचाही सहभाग नाही
दिल्लीच्या धार्मिक संमेलनात बीड जिल्ह्यातील कुणीही सहभागी नसल्याची प्रशासनाची माहिती आहे. मात्र त्यानंतरही खबरदारी घेण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांतून आलेल्यांची यादी तयार करण्यात येत आहे.
नांदेड : ८ भाविकांची तपासणी
जिल्ह्यातील ११ जण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी कळविले होते. त्यावरून शोध घेऊन बुधवारी ८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाचा शोध सुरू आहे, इतर दोघे दुसºया जिल्ह्यातील असल्याचे आढळले. नांदेड येथून दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची संख्या २७ झाली आहे.