Join us

जर्मन मल्लखांबपटूंनी वेधले मुंबईकरांचे लक्ष

By admin | Published: January 04, 2016 2:14 AM

अरे वा... किती सुंदर आहे. आई मलादेखील असे करायचे आहे. मलादेखील हे शिकायचे आहे. मला जमेल ना?... अशी काहीशी प्रतिक्रिया दादरमध्ये झालेल्या मल्लखांब सादरीकरण करताना ऐकू येत होती

मुंबई : अरे वा... किती सुंदर आहे. आई मलादेखील असे करायचे आहे. मलादेखील हे शिकायचे आहे. मला जमेल ना?... अशी काहीशी प्रतिक्रिया दादरमध्ये झालेल्या मल्लखांब सादरीकरण करताना ऐकू येत होती. दादर शिवाजी पार्कात श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या पटांगणात जर्मन मल्लखांब प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या शिबिरासाठी जर्मनीच्या म्युनिक शहरातील १३ जणांचा संघ सहभागी झाला होता. उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन मल्लखांबपटूंनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रोप मल्लखांब, पोल मल्लखांब, हँगिंग मल्लखांब, बॉटल मल्लखांब यांचे सादरीकरण केले. मुंबईकरांनीदेखील टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा बाणे गुरुजी पकड, शवासन, प्रौढासन, पद्मासन यांना दाद दिली. रोप मल्लखांबात निद्रासन, नटराजासन, वृक्षासन बजरंगपकड यांच्या सादरकरणाने तर सांघिक मल्लखांबाच्या शानदार पिरॅमिडने उपस्थितांची मने जिंकली. जर्मन मल्लखांबपटू युटा श्नायडर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मुंबईत दाखल झाला. जर्मनीत मल्लखांब प्रशिक्षिका म्हणून काम पाहणाऱ्या रुथ अझेंन्बर्गर यांच्यासह लुका रोथबॉवर, हाना फ्रेडरिक, सबॅस्टियन क्रिमर, लुईस फ्रॅन्झल रोझाली फ्रॅन्झल, सोफिया स्पिट्झ, याना योलिफ, मोरिट्झ डायटनमेयर, अ‍ॅन्टोनिया हुबर, नियाम लुबे या मल्लखांबपटूंनी या शिबिरात नेत्रोद्दीपक मल्लखांबाचे सादरीकरण केले. जर्मन मल्लखांबपटूंना तज्ज्ञ भारतीय प्रशिक्षकांकडून भरतनाट्यम्, वारली पेंटिंग, रांगोळी, हिंदी भाषेचेही शिक्षण देण्यात आले. समर्थ मंदिरात शिकणारी मुले ही सामर्थ्यशील असल्याने ती परदेशी मुलांमध्ये हा खेळ रुजवण्यात यशस्वी झाली आहेत. जर्मन मल्लखांबपटूंनेदेखील ज्या आत्मीयतने ही प्रात्यक्षिके सादर केली त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक करावेसे वाटते. आजच्या व्हॉटस अ‍ॅप, फेसबूकमध्ये गुरफटलेल्या तरुणांना मैदानावर आणण्यासाठी मल्लखांब हा सुंदर खेळ आहे. या खेळामुळे शारीरिक विकासाबरोबर खेळाडूंच्या बौद्धिक क्षमतेतही वाढ होते. त्यांची एकाग्रता वाढते. महाविद्यालयांमध्येदेखील या खेळाचा प्रचार सध्या सुरू आहे. त्यालाही विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे, अशी स्पष्टोक्ती मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. मनाली लोंढे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.