लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या नेस्को कोविड सेंटरला एक वर्ष पूर्ण झाले. येथे स्वच्छता हा मोठा प्रश्न असून, आय. सी. यू.मध्ये म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर बेडशिट्स, टॉवेल्स किंवा उशीचे कव्हर हे वेळोवेळी बदलले पाहिजे. ह्युमिडफायरमध्ये डीस्टील्ड वॉटर वापरले जाते, तेही स्टोर्स ऑफ इन्फेक्शन होऊ शकते. तसेच आजही आयसीयूमध्ये हॉस्पिटल एअर बॉर्न इन्फेक्शन होऊ नये म्हणून एअर बॉर्न सॅम्पल घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सुपर अँडेड इन्फेक्शन, बुरशीला आळा बसेल आणि मृत्यू दर कमी होईल, असा विश्वास राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला.
नेस्को कोविड सेंटरच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी येथे भेट देऊन येथील अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांना सूचना केल्या होत्या. तर याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना डॉ. दीपक सावंत यांनी केली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अतिशय जिकरीच्या काळात सुरुवातीला तुटपुंज्या सामुग्रीत कोरोनाशी दोन हात करत डॉ. नीलम अंद्राडे यांनी काही चांगले निर्णय घेतले. त्यांनी डॉक्टरांचे आऊट सोर्सिंग करणे टाळले. महापालिकेच्या व वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून डॉक्टरांची व्यवस्था केली. डॉ. दीपक सावंत यांची सतत २४/७ लॅबोरेटरीचे रिपोर्ट तत्काळ मिळून उपचार पद्धतीत डॉक्टरांना बदल करता येईल, ही मागणी आता पूर्ण होत आहे. तसेच सीटी स्कॅनसाठी रुग्णांना ट्रामा केअर किंवा कूपर हॉस्पिटलमध्ये नेऊन संसर्ग वाढण्यापेक्षा नेस्कोमध्येच सीटी स्कॅन सुरू झाले तर रुग्णांना लगेच ट्रिटमेंट मिळेल, अशी डॉ. दीपक सावंत यांची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे. येथे सीटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, येथे अजूनही काही त्रुटी असून, त्याकडे त्यांनी डॉ. नीलम अंद्राडे यांचे लक्ष वेधले.
--------------------------------------