Join us

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, मध्य रेल्वेचे रात्रीचे ‘रडगाणे’ सुरूच आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 9:34 AM

मध्य रेल्वेचे रात्रीचे रडगाणे संपणार तरी कधी, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेमार्गावर लोकलची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. दर आठवड्याला मेगा ब्लॉक घेतला तरी मध्य रेल्वेचे रडगाणे सुरूच आहे. शनिवारी रात्री पुन्हा याचा प्रत्यय आला. कसारा गाडी पाऊण तास तर शेवटची कर्जत गाडी तब्बल तासभर लेट आल्याने कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र ‘मेगा’ हाल झाले. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी उसळली होती. मध्य रेल्वेचे रात्रीचे रडगाणे संपणार तरी कधी, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा, आसनगाव, पनवेल, ठाणे ते तुर्भे, नेरूळ ते खारकोपर दरम्यान लोकल धावतात. मध्य रेल्वेवरून दिवसाला सुमारे ३६ लाख प्रवासी प्रवास करतात.  सकाळच्या गर्दीच्या वेळी  कल्याण, बदलापूरसह ठाणे,नवी मुंबई पुणे  आणि उपनगरांतून मुंबईत कामानिमित्त लाखो प्रवासी येतात तर संध्याकाळी घरी जाण्यासाठी पुन्हा लोकलनेच प्रवास करतात; परंतु या गाड्यांचे वेळापत्रक रात्रीच्या वेळी कोलमडते. त्यांचा फटका प्रवाशांना बसतो. 

कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे ‘मेगा’ हालशनिवारी दादर स्थानकात रात्री १२.३२ ला येणारी कसारा लोकल पाऊण तास म्हणजे रात्री १. १७ तर १२.४२ ला येणारी कर्जतची लोकल रात्री १. ३८ ला म्हणजे तब्बल १ तास उशिरा आली. मध्य रेल्वेवर बिघाड होण्याच्या घटनांत वाढ होत आहे त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असून  त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

सीएसएमटीवरून कल्याण कसाराच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अर्ध्या तासाहून उशिराने धावत होत्या. परळ रेल्वे स्थानकात ११.१५ सुमारास येणाऱ्या लोकल ११. ४५ नंतर आली असे एका प्रवाशाने सांगितले.

दादर आणि परळ  स्थानकात गर्दी दादर स्थानकातून दादर लोकल बंद केल्यानंतर परळ  रेल्वे स्थानकात गर्दी वाढत आहे. शनिवारी लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने  दादर, परळ  आणि भायखळा स्थानकात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. 

शनिवारी रात्री ११ पासून ब्लॉक घेण्यात आला होता त्यामुळे काही लोकल सेवांवर परिणाम झाला असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :भारतीय रेल्वेप्रवासीलोकल