तरुणतुर्कांच्या कामगिरीकडे लक्ष
By admin | Published: February 26, 2017 03:24 AM2017-02-26T03:24:30+5:302017-02-26T03:24:30+5:30
मुंबई महापालिकेच्या नवीन सभागृहात १५५ नवीन चेहरे मिळाले आहेत. त्यामध्ये १८ नगरसेवक २१ ते ३० या वयोगटातील आहेत़ त्यांच्या कामगिरीकडे विशेष
मुंबई : मुंबई महापालिकेच्या नवीन सभागृहात १५५ नवीन चेहरे मिळाले आहेत. त्यामध्ये १८ नगरसेवक २१ ते ३० या वयोगटातील आहेत़ त्यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे. ३८ टक्के उमेदवार ४१ ते ५० वयोगटातील आहेत. ६१ वर्षांहून अधिक वयाचे १२ असून, उर्वरित ५१ ते ६० या वयोगटातील आहेत. या नवख्यांना सभाशास्र, सभेचे कामकाज व त्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी विजयी अनुभवी विद्यमान व माजी ६२ नगरसेवकांवर आहे.
पालिकेच्या २२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित ११३ जागांमध्येही महिलांना उमेदवारी मिळाल्याने २०१२च्या तुलनेत पाच टक्के अधिक महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत. यामध्ये नवख्या आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या महिलांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे या तरुणांनी अनेक ठिकाणी मातब्बर नगरसेवकांना पराभवाची धूळ चारली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अनेक ठिकाणी जायंट किलर ठरले आहेत. हे नवखे चेहरे पालिकेत किती प्रभावी ठरतात याविषयी उत्सुकता वाढली आहे. (प्रतिनिधी)
तरुणांनी मारली बाजी
भाजपाचा तरुण चेहरा रोहन राठोड यांनी माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांचा पराभव केला. कामात गटाचे आंबेरकर यांनी काँग्रेसला राम राम करीत शिवसेना गाठली. आंबेरकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. सर्वांत पहिल्या महिला सभागृह नेता असलेल्या तृष्णा विश्वासराव यांचा काँग्रेसचे सुफियान वानू यांनी पराभव केला. वानू अवघे ३३ वर्षांचे आहेत. भाजपाच्या नवीन चेहरा असलेल्या हर्षित नार्वेकर पहिल्याच निवडणुकीत विद्यमान नागरसेविकेला पराभूत करून विजयी झाल्या.
आजी-माजी नगरसेवकांना यश
६० नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यापैकी निम्मे बाद झाले. तर २६ माजी नगरसेवक मात्र पुन्हा एकदा महापालिकेत येणार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या राजुल पटेल, शुभदा गुडेकर, चित्रा सांगळे, संजय अगलदरे, मंगेश सातमकर, सुजाता पटेकर, विश्वनाथ महाडेश्वर, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, आशिष चेंबूरकर, सुवर्ण कारंजे, यशवंत जाधव, आशा कोपरकर, जगदीश अमीनकुट्टी, रवी राजा, प्रभाकर शिंदे, दक्षा शाह, परमेश्वर कदम आदींचा समोवश आहे.
सर्वांत तरुण नगरसेवक
गोवंडी येथील आयेशा शेख या सर्वांत तरुण नगरसेविका आहेत. त्या २१ वर्षांच्या असून, गृहिणी आहेत. त्यांचे काका इरफान खान समाजवादीचे कार्यकर्ते आहेत. महिलांसाठी आरक्षित झाल्याने शेख यांना उमेदवारी मिळाली. शिवसेनेच्या उमेदवाराला पाच हजार मतांच्या फरकाने त्यांनी पराभूत केले.
सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक
भाजपाचे डॉ. राम बारोट हे आतापर्यंत सहावेळा निवडून आलेले आहेत. ते ७१ वर्षांचे असून, नवीन सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक ठरले आहेत. १९९२पासून मालाडमधून निवडून येत आहेत. १० हजार मताधिक्यांनी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव केला.
हेच ते नवीन चेहरे
तेजस्विनी घोसाळकर, संजय घाडी, श्वेता कोरगावकर, संगीत शर्मा, मनीषा राहटे, निधी शिंदे, अंजली नाईक, नादिया शेख, वैशाली शेवाळे, सान्वी तांडेल, सुफियान वानू, समाधान सरवणकर, सुप्रिया मोरे, सोनम जामसुतकर, पराग शाह, अल्पा जाधव, नील सोमैया, आकाश पुरोहित, हर्षिता नार्वेकर अशी काही नावे आहेत.
अनुभवी नगरसेवकांचा आधार
सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या श्रद्धा जाधव, राम बारोट, किशोरी पेडणेकर, मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, उज्ज्वला मोडक, ज्योती आळवणी, शीतल म्हात्रे, मकरंद नार्वेकर, प्रभाकर शिंदे, राजुल पटेल अशा ६२ नगरसेवकांचा समावेश आहे.