जमीर काझी, मुंबईमहानगरातील दळणवळण व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ५० हजार कोटींच्या प्रकल्पाचे भवितव्य उद्या (गुरुवारी) निश्चित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) बैठक होणार असून त्यामध्ये काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोट्यवधीच्या ३ प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. उद्याची प्राधिकरणातील मुख्यमंत्र्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महानगरातील भविष्यातील पायाभूत सुविधांची दिशा निश्चित होणार आहे. नव्याने बनविलेल्या दहिसर ते मानखुर्द मार्गावरील मेट्रो-२, वडाळा-तीन हात नाका-कासारवडवली (ठाणे) आणि कलानगर जंक्शनवरील ३ उड्डाणपूल या प्रमुख प्रकल्पांचा यात समावेश असल्याचे प्राधिकरणातील विश्वसनीय सूत्रांकडून स्पष्ट केले. काँग्रेस आघाडीच्या काळातील काही प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाले आहेत तर बहुतांश अंतिम आणि प्रलंबित अवस्थेत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार या प्रकल्पाबाबत कोणते निर्णय घेते, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.एमएमआरडीए प्राधिकरणाच्या उद्याच्या बैठकीत मांडण्यात येणाऱ्या प्रकल्पाची थोडक्यात माहिती अशी : अ) नियोजित दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो-२ - गेल्या आठ वर्षांपासून निश्चित केलेल्या पूर्वीच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळत नसल्याने त्याबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने राज्य सरकारबरोबरचा सवलत करारनामा गेल्या मंगळवारी रद्द केला आहे. त्यामुळे नव्याने पूर्ण भूमिगत मार्गावरील हा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्याला प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाईल.
पन्नास हजार कोटींच्या प्रकल्पांकडे लक्ष
By admin | Published: November 20, 2014 1:05 AM