लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडमुक्त भागात १५ जुलैपासून ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्याचवेळी राज्यातील पालकांनी प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याकडे जास्त कल दाखविलेला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून राज्यांच्या काही जिल्ह्यांत शाळा सुरू होण्याची चिन्हे असल्याने विद्यार्थी पालक उत्सुक आहेत. मात्र, अभ्यासकांच्या आणि मुख्याध्यापक संघटनांच्या मते, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शाळांना कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
१ महिना आधीपासून एकही कोरोना रुग्ण नसलेल्या कोविडमुक्त क्षेत्रात या शाळा सुरू करण्याचा महत्त्वाचा निकष शाळांना पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शाळांचे दैनंदिन निर्जंतुकीकरण, स्वच्छता, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर अशा संसाधनांसाठी लागणारा निधी, त्याची तरतूद कोणी करायची हे प्रश्न अनुत्तरितच असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी केवळ मार्गदर्शक सूचना न करता यासंदर्भातील निर्णय घेतल्यास शाळांना वर्ग सुरू करण्याचे निर्णय अधिक स्पष्टपणे आणि नियोजनासह घेता येतील असे मत मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी व्यक्त केले.