अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:09 AM2021-09-12T04:09:18+5:302021-09-12T04:09:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु असून, अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ही उद्या, १३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु असून, अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ही उद्या, १३ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. आतापर्यंत दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून मुंबई विभागात अकरावीचे १ लाख ८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अकरावीच्या पहिल्या २ फेऱ्यांमध्ये मिळून १ लाख ७७ हजार ९२० जागा जाहीर झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षातील प्रवेशाचे प्रमाण हे खूप कमी आहे. त्यामुळे अकरावीच्या जाहीर होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत तरी विद्यार्थी प्रवेश घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदा दहावीच्या निकालात अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे मोठी वाढ झाली. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा लागेल आणि महाविद्यालयांचा कट ऑफ ९५ टक्क्यांच्या खाली उतरणार नाही, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतही महाविद्यालय अलॉट होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतले नसल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, अकरावीसोबतच आयटीआय, अभियांत्रिकी डिप्लोमा या प्रवेश प्रक्रियाही सुरु असल्याने अकरावी प्रवेशासाठी इच्छुक बरेचसे विद्यार्थी यंदा शिक्षणानंतर लगेचच नोकरी करण्याच्या हेतूने या अभ्यासक्रम आणि प्रवेशांकडे वळले असल्याची चर्चा आहे.
आता आवश्यकतेप्रमाणे विशेष फेरी
तिसरी गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार असून, यानंतर आवश्यकतेप्रमाणे विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. निकालात वाढ होऊनही पहिल्या गुणवत्ता यादीच्या कट ऑफमध्ये मागील वर्षीपेक्षा घसरण दिसून आली. पहिल्या यादीमध्ये अनेकांचे अर्ज अपूर्ण राहिल्याने दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालयांचा कट ऑफ वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, १ ते २ टक्क्यांच्या किंचित घसरणीशिवाय यादीत फारसा फरक दिसून आला नाही. पहिल्या गुणवत्ता यादीत ९ हजार तर दुसऱ्या गुणवत्ता यादीत ४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नसल्याने अधिक आश्चर्य व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांना आता नियमित फेरीनंतर विशेष फेरीशिवाय आता पर्यायच राहिलेला नाही. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीसाठी प्रवेश घेतलेला नाही, त्यांना उद्याच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे.
पहिली फेरी : ५८ हजार ३००
दुसरी फेरी : २१ हजार ११६
कोट्याद्वारे प्रवेश : २८ हजार ९८६
एकूण : १ लाख ८ हजार ४०२