लग्नाला जाताय, दागिने सांभाळा; चेन स्नॅचिंगच्या ११२ घटना उघड !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:17 AM2023-12-29T10:17:14+5:302023-12-29T10:18:09+5:30
१०८ गुन्ह्यांची उकल करण्यात यश, चाेऱ्या टाळण्यासाठी विशेष माेहीम.
मुंबई : गेल्या अकरा महिन्यांत मुंबईत सोनसाखळी चोरीप्रकरणी ११२ गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली. यापैकी १०८ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. त्यामुळे लग्न समारंभाला जाताना दागिने सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येते. तसेच चाेऱ्या टाळण्यासाठी पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे.
मुंबईत इतर ४० हजार ५६९ गुन्ह्यांची नोंद झाली असून यामध्ये दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यांत कोट्यवधींची मालमत्ता चोरी गेली. मुंबईत चोरीचे ६,१२० गुन्हे नोंद झाले. घरफोडीचे (१,१९९), जबरी चोरीचे (५८६), वाहन चोरी (२,४४५) गुन्ह्यांचा समावेश आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच बेस्ट, रेल्वेने प्रवास करताना दागिने सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. गर्दीचा फायदा घेत आरोपी हात साफ करत आहेत.
रात्रीस खेळ चाले :
अकरा महिन्यांत दिवसा २०७ तर रात्रीच्या सुमारास ९९२ घरफोडीच्या घटनांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. रात्रीचा फायदा घेत चोरट्यांकडून घरफोडीच्या घटना वाढत आहे.९९२ घरफोडीच्या घटनांची रात्रीच्या सुमारास नोंद ,२०७ घटना दिवसा घडल्या.
आजोबांना मसाज पडला महागात :
मुंबई लोकलने प्रवास करताना कुर्ला रेल्वे स्थानकात फलाटावर महिलांसोबत झालेली ओळख एका वयोवृद्धाला चांगलीच महागात पडली आहे. या महिलांनी वयोवृद्धाला चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेत बाॅडीमसाज करत त्यांच्या गळ्यातील सव्वातीन तोळ्याची सोनसाखळी लंपास केल्याची घटना गोवंडीत घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.