Join us

शालेय विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक घरगुती मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:18 PM

ई लर्निंगच्या कला गृहपाठात विद्यार्थ्यांचा असाही अभ्यास

मुंबई : केंद्र आणि सरकारने मास्कच्या मागणीत झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता घरीच घरगुती पद्धतीचे मास्क तयार करून वापरण्याचे आवाहन केले आहे. घरगुती व स्वच्छ मास्कचा  वापर करून बाजारमधील मास्कच्या साठेबाजीला आळा घालणे आणि अत्यावश्यक  कामगारांना याचा पुरवठा सुरळीत करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी घरातल्या स्वच्छ कापडांपासूनही मास्क बनवता येऊ शकतात, याचे प्रात्यक्षिकच शालेय विदयार्थ्यांनी दिले आहे. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कापडी आणि आकर्षक पद्धतीचे मास्क तयार केले आहेत. .कोरोनामुळे संचारबंदी असली तरी डी. एस. हायस्कूल सोशल मीडिया तसंच ई-लर्निंग तंत्रज्ञानाचा अवलंब करुन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे तसेच कला साक्षरतेचे विविध उपक्रम राबवत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कला साक्षरता तसंच दृष्य कला भान विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या 'चित्रपतंग कलासमूहा'ने विद्यार्थ्यांना घरातल्या कापडापासून मास्क बनवण्याचा गृहपाठ दिला होता. "विद्यार्थ्यांनी रुमालापासून तसंच कापडाच्या तुकड्यांपासून स्वतसाठी मास्क बनवले. विशेष म्हणजे, या मास्कवर विद्यार्थ्यांनी चित्रं काढून, त्यावर सामाजिक संदेश लिहून ते मास्क अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला", अशी माहिती चित्रपतंगच्या संचालिका प्राची श्रीनिवासन यांनी दिली.

 

 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहर्‍यावर मास्क घालणे देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे.  एन-९५ आणि सर्जिकल मास्कचा बाजारात तुटवडा जाणवू लागला. बाजारात ‘सर्जिकल’, ‘एन-९५’, काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगातील मास्क आता पन्नास ते पाचशे रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध होऊ लागले. घरगुती मास्कचा पर्याय सरकारने स्वीकारण्यास संगितला.  बाजाराप्रमाणेच  विद्यार्थ्यांनीही नानाविध रंगाचे, प्रिंटेड, नक्षीदार, पोलका डॉट असलेले मास्कचे प्रकार बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस