हेरिटेज वास्तूंसाठी आकर्षक पथदिवे, महापालिकेचा निर्णय : सिग्नल, चौकात नऊ हेरिटेज खांब बसवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:41 AM2017-10-11T03:41:39+5:302017-10-11T03:42:13+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालय या ‘हेरिटेज वास्तूं’च्या समोरच्या चौकातील पथदिवे आणि सिग्नल यांच्या खांबांनाही आता ‘हेरिटेज लूक’ मिळणार आहे.

 Attractive Pathway for Heritage Architect, Municipal Corporation Decision: Signal, nine Heritage Block to be constructed in Chowk | हेरिटेज वास्तूंसाठी आकर्षक पथदिवे, महापालिकेचा निर्णय : सिग्नल, चौकात नऊ हेरिटेज खांब बसवणार

हेरिटेज वास्तूंसाठी आकर्षक पथदिवे, महापालिकेचा निर्णय : सिग्नल, चौकात नऊ हेरिटेज खांब बसवणार

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालय या ‘हेरिटेज वास्तूं’च्या समोरच्या चौकातील पथदिवे आणि सिग्नल यांच्या खांबांनाही आता ‘हेरिटेज लूक’ मिळणार आहे. सध्या या परिसरात पथदिव्यांचे २२ खांब असून, वाहतूक सिग्नलचे १० खांब असे ३२ सामान्य प्रकारचे खांब आहेत. त्याऐवजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्या परिसराला शोभतील, असे नऊ हेरिटेज खांब बसविले जाणार आहेत.
दक्षिण मुंबईतील दादाभाई नौरोजी मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पश्चिम द्वारासमोरच्या मुख्य चौकात सध्या पथदिव्यांचे २२ खांब आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक सिग्नलचे १० खांब आहेत. हे सर्व खांब हटवून त्यांच्या जागी हेरिटेज नऊ खांबांपैकी पाच खांब पथदिव्यांचे असणार आहेत. त्यांची उंची ही प्रत्येकी ३९.३७ फूट एवढी असणार आहे. तर उर्वरित चार खांब हे वाहतूक सिग्नलसाठी उपयोगात येणार आहेत.
सध्या अस्तित्वात असलेल्या पथदिव्यांच्या २२ खांबांवर सोडिअम व्हेपर प्रकारचे ३६ दिवे आहेत. पिवळसर प्रकाश देणारे हे सर्व दिवे १५० वॅटचे असून, या दिव्यांपासून सरासरी ३० ‘लक्स’ इतकी प्रकाश-तीव्रता प्राप्त होत आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या हेरिटेज अनुरूप पाच खांबांवर प्रत्येकी चार दिवे, याप्रमाणे एकूण २० दिवे बसविले जाणार आहेत. यापैकी प्रत्येक दिवा हा १३६ वॅटचा व एलईडी पद्धतीचा असणार आहे. या अत्याधुनिक पद्धतीच्या दिव्यांपासून सरासरी ३४ ‘लक्स’ एवढी प्रकाश तीव्रता प्राप्त होणे अपेक्षित आहे.
सर्व हेरिटेज खांब हे ‘माया डिझाईन’ या प्रकारातले असणार आहेत. हे सर्व खांब गंजरोधक असणार आहेत. या खांबांचे अपेक्षित आयुर्मान हे सुमारे २५ वर्षे असणार आहे. या खांबांचा रंग करडा असणार असून, ते इटली येथून आयात केले जाणार आहेत. विशेष म्हणजे पथदिव्यांच्या खांबांवर खालच्या बाजूला वाहतूक सिग्नल बसविण्याचीदेखील सुविधा असणार आहे, ज्यामुळे भविष्यात गरज भासल्यास वाहतूक सिग्नलसाठी नवीन खांब न बसवितादेखील सिग्नलची संख्या वाढविणे शक्य असणार आहे.
खांबांची व दिव्यांची संख्या जरी कमी होणार असली तरी प्रकाश तीव्रतेमध्ये सुमारे १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होणार आहे. तर विद्युत खर्चातदेखील बचत शक्य होणार आहे. या हेरिटेज अनुरूप खांबांसाठी ९६ लाख रुपये खर्च अंदाजित आहे. याबाबत आॅनलाइन पद्धतीने निविदा भरण्याची अंतिम तारीख १४ आॅक्टोबर आहे. मार्च-२०१८पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

Web Title:  Attractive Pathway for Heritage Architect, Municipal Corporation Decision: Signal, nine Heritage Block to be constructed in Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.