मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तुलनेत यंदा घरगुती गणपतींचे देखावे अत्यंत आकर्षक साकारण्यात आले आहेत. परळ येथील म्हाडगुत कुटुंबीयांच्या घरगुती बाप्पाला अशाच प्रकारे आकर्षक देखावा सकारण्यात आला आहे. संत बाळू मामांच्या काळातील हुबेहूब वाटणारे गाव, लोकं व पाळीव प्राणी या देखाव्यामध्ये साकारण्यात आले आहेत. संत बाळू मामा जणू स्वतःच बाप्पाच्या दर्शनाला आले असल्याचे या देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
या देखाव्यामध्ये संत बाळू मामा गावातील एका दगडावर बसले असून, त्यांच्याजवळ गाई, मेंढ्या व शेळ्या दाखविण्यात आल्या आहेत. यासोबतच गावातील घरं, झाडे तसेच एक कुंभार मातीची भांडी बनविताना दाखविण्यात आला आहे. हा देखावा थेट आपल्याला बाळू मामांच्या काळात घेऊन गेल्याचा भास होतो. म्हाडगुत परिवाराच्या बाप्पाची मूर्ती दरवर्षी शाडूच्या मातीपासून घडविण्यात येते. दरवर्षी याच प्रकारे आकर्षक देखावा साकारण्यात येतो, असे कुटुंबातील सदस्य शार्दुल म्हाडगुत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.