मुंबई-
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत तब्बल सव्वाशे तासांचे केलेले स्टिंग ऑपरेशन २९ वेगवेगळ्या पेनड्राइव्हमध्ये भरुन सादर केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधकांविरुद्ध कत्तलखाना चालवत असल्याचा सनसनाटी आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीस बोलत होते तेव्हा विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य चिडीचूप होते. सरकारमधील नेत्यांच्या इशाऱ्यावरुन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांच्या सहकार्याने भाजपच्या किमान डझनभर नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.
फडणवीसांच्या याच व्हिडिओ बॉम्बनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही आज सकाळी सूचक ट्विट केलं आहे. "देवेंद्र आहेत ते तळपती तलवार आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार आहेत..", असं ट्विट करत भातखळकर यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
गृहमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्षफडणवीसांनी थेट विधानसभेतच पुरावे सादर केल्यानंतर आता त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज सभागृहात सरकारच्यावतीनं स्पष्टीकरण देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच नवाब मलिकांच्या राजीनाम्याचीही मागणी भाजपानं लावून धरलेली आहे. त्यावरही महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.