अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांनाही मदत करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:01 PM2021-07-26T13:01:29+5:302021-07-26T13:02:09+5:30
मुंबईतील नुकसानग्रस्तांना सुद्धा विनानिकष भरीव मदत करावी अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, परंतु ही मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्त नागरिकांना विसरू नका. मुंबईतील नुकसानग्रस्तांना सुद्धा विनानिकष भरीव मदत करावी अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून ४० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, हजारो घरांमध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाकूर कॉम्प्लेक्स सह अनेक ठिकाणी पाणी साचून हजारो ऑटोरिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. २००५ साली झालेल्या नुकसानापेक्षा अधिकचे नुकसान होऊन सुद्धा अद्याप पावतो साधे नजर पंचनामे सुद्धा करण्यात आलेले नाहीत. सरकारी अधिकारी फक्त खावटी अनुदान देऊ असे संतापजनक उत्तर देत आहेत.
बेसुमार पावसामुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना आता तरी मदत करावी, अन्यथा मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.