अतुल परचुरेला ऑनलाइन बॅग पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:26 AM2019-04-16T06:26:37+5:302019-04-16T06:26:44+5:30

अभिनेता अतुल भरत परचुरेला ऑनलाइन बॅग खरेदी भलतीच महागात पडली.

Atul Pachurela bags online bag | अतुल परचुरेला ऑनलाइन बॅग पडली महागात

अतुल परचुरेला ऑनलाइन बॅग पडली महागात

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : अभिनेता अतुल भरत परचुरेला ऑनलाइन बॅग खरेदी भलतीच महागात पडली. सवलतीच्या मोहात, बॅग तर दूरच, भरलेले पैसेदेखील परत न मिळाल्याने त्यांना थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. या प्रकरणी दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
अभिनेता अतुल परचुरे (५२) दादर परिसरात राहतो. ११ मार्चला फेसबुकवर सर्च सुरू असताना, एका साइटवरील शोल्डर बॅग त्याच्या नजरेत पडली. त्याची किंमत ४२ हजार ६१५ रुपये होती. त्यावर २३ हजार ४३८ रुपयांची सवलत असल्याने, अवघ्या १९ हजार १७६ रुपयांत ती बॅग मिळणार होती. त्याने त्या जाहिरातीवर बॅग घेण्यासाठी पुढाकार घेताच, त्याला पैसे भरण्यासाठी लिंक पाठविण्यात आली. त्याने आॅर्डर बुक करताना ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ हा पर्याय निवडला होता.
१२ मार्च रोजी त्याच्या मोबाइलवर अनोळखी महिलेने कॉल करून, बॅगेसाठी आॅनलाइन पैसे भरल्यास आणखी ८ टक्के सवलत मिळणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, त्याने पेटीएमद्वारे १७ हजार ६४१ रुपये महिलेने दिलेल्या खात्यावर जमा केले. आठ दिवसांत बॅगेची डिलिव्हरी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याने पैसे देतात, त्याला मेल आला. त्यात आॅर्डर क्रमांक होता. मात्र, पुढे बरेच दिवस उलटूनही बॅग न मिळाल्याने त्याला संशय आला. त्यात, ३० मार्च रोजी मेलवर आलेल्या मेसेजमध्ये मार्चअखेर असल्यामुळे बॅगेची डिलिव्हरी होऊ शकणार नाही, असे नमूद करण्यात आले होते.
अखेर त्याने संबंधित ईमेल, तसेच मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, अधिक तपास सुरू केला आहे.
>चौकशी सुरू
संबंधित व्यवहाराचा आयपी अ‍ॅड्रेस मागविण्यात आला आहे. तो येताच त्यानुसार, व्यवहार कुठे व कसा झाला? याची माहिती मिळले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
- दिवाकर शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादर पोलीस ठाणे.

Web Title: Atul Pachurela bags online bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.