चिन्मय काळे मुंबई : फक्त ४४ एकर जमिनीची तब्बल ५६६ कोटी रुपयांना जेएनपीटीतील विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) खरेदी झाली आहे. दुबईच्या डीपी वर्ल्ड कंपनीने या जमीन खरेदीद्वारे बहुचर्चित फॉक्सकॉन कंपनीचा निविदेत पराभव केला आहे.फॉक्सकॉन ही तैवानमधील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे सुटे भाग तयार करणारी जगातील अव्वल कंपनी आहे. कंपनी पुण्याजवळ ५०० कोटी डॉलर्सची (सुमारे ३० हजार कोटी रुपये) मोठी गुंतवणूक करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये केली. पण अद्याप कंपनीने एक रुपयाची वीटसुद्धा रचलेली नाही. त्यानंतर अलिकडेच जेएनपीटीने एसईझेडमधील ४४ एकरसाठी निविदा जाहीर केली होती. ही निविदा भरण्यासंबंधी स्वत: केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती. फॉक्सकॉनने निविदा भरली. पण त्यामध्ये कंपनीला दुबईच्या डीपी वर्ल्ड या कंपनीकडून पराभूत व्हावे लागले आहे.जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (जेएनपीटी-एसईझेड) ‘फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग’ भागातील (एफटीडब्ल्यूझेड) जमिनीसाठी ही निविदा पाच कंपन्यांनी भरली होती. तांत्रिक पडताळणीनंतर तीन कंपन्या अंतिम शर्यतीत होत्या. स्कॉटलंडमधील लोगोस लॉजिस्टिक्स, फॉक्सकॉन व डीपी वर्ल्ड यांचा त्यात समावेश होता. तीन कंपन्यांमधील अंतिम लिलावाची सुरुवात ११० कोटी रुपयांपासून झाली. हा लिलाव ५६६ कोटी रुपयांवर येऊन थांबला. डीपी वर्ल्डने ही बोली लावली व जिंकली. त्यामुळे फॉक्सकॉनची गुंतवणूक पुन्हा खोळंबली.या जमिनीला भरमसाठ दर मिळण्यामागील मुख्य कारण नवी मुंबई विमानतळ, हे आहे. जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई विमानतळाची प्रस्तावित जागा यामधील अंतर फक्त २१ किमी आहे. त्याखेरीज ‘नैना’ स्मार्ट सिटी, तसेच उरण येथील जेएनपीटीपर्यंत रेल्वेमार्गही तयार होत आहे. भविष्यात हे ठिकाण व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक प्रबळ ठरणार असल्यानेच या जमिनीला डीपी वर्ल्ड कंपनीने इतकी भरमसाठ किंमत देऊ केली आहे.>फॉक्सकॉनबाबत संशयफॉक्सकॉनच्या गुंतवणुकीबाबत राज्य सरकार सातत्याने स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. पण वास्तवात सामंजस्य कराराच्या तीन वर्षानंतरही ही गुंतवणूक आलेली नाही. त्यामुळेच फॉक्सकॉन महाराष्टÑात येणार की नाही?, असा संशय निर्माण होतं आहे.>देशातील सर्वाधिक दर४४ एकरासाठी ५६६ कोटी हा दर उल्लेखनीय आहे. उद्योगाच्या जमिनीसाठी मिळालेला हा देशातील सर्वाधिक दर आहे. यावरुन जेएनपीटीलगतचे आर्थिक क्षेत्र हे जगातील अग्रणी बंदरांपैकी एक असल्याचे सिद्ध होत आहे.’- एस. सीत्तारसू, सीईओ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट एसईझेड
अबब! ४४ एकर जमिनीची ५६६ कोटींना खरेदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:29 AM