रिक्षाचालकांची अजब उत्तरे
By admin | Published: March 8, 2016 02:26 AM2016-03-08T02:26:02+5:302016-03-08T02:26:02+5:30
मुख्यमंत्र्यांचे नाव काय तर नरेंद्र फडणवीस, मंत्रालय कुठे तर अंधेरीत.. अशी अनेक उत्तरे मिळाल्याने रिक्षाचालकांची मराठी भाषेची परीक्षा सध्या चर्चेत आहे
मुंबई : मुख्यमंत्र्यांचे नाव काय तर नरेंद्र फडणवीस, मंत्रालय कुठे तर अंधेरीत.. अशी अनेक उत्तरे मिळाल्याने रिक्षाचालकांची मराठी भाषेची परीक्षा सध्या चर्चेत आहे. प्रश्नांची अजब उत्तरे मिळत असल्याने आरटीओ अधिकारीही चक्रावून गेले आहेत. अमराठी उमेदवारांसाठी तर ही परीक्षा ‘अग्निपरीक्षा’च ठरली.
१२ जानेवारी रोजी ४२ हजार ७९८ आॅटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले होते. यशस्वी उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याने परिवहन विभागाने २९ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत मराठी भाषाज्ञानाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेला राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात सुरुवात झाली. परीक्षेसाठी सर्व आरटीओ कर्मचाऱ्यांकडून जय्यत तयारी करून घेण्यात आली. मुंबईतील अंधेरी, बोरीवली, वडाळा आरटीओंतर्गतही मोठ्या प्रमाणात परवानावाटप करण्यात येत आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वडाळा आरटीओने तर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे २७ फेब्रुवारीपासूनच परीक्षेला सुरुवात केली. परीक्षा संपुष्टात आल्यानंतरही ज्यांच्याकडून काही कागदपत्रे सादर करण्यात त्रुटी राहिल्या त्यांची ७ मार्च रोजी मराठी भाषेची चाचणी घेण्यात आली.
एका परिच्छेदाचे वाचन करण्याची अट उमेदवारांना घालण्यात आली होती. त्यानुसार काहींनी मराठी परिच्छेद वाचलेही. तर ज्या उमेदवारांना वाचता येत नव्हते त्यांना मराठीतून प्रश्न विचारण्याचा आणि त्याचे उत्तर देण्याचा पर्याय ठेवला, मात्र उत्तरे ऐकून कर्मचारी चक्रावून गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस, फडवणीस, फर्नांडिस’ अशी उत्तरे देण्यात आली. अनेकांनी सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असल्याचेही सांगितले. हा संवाद चालक आणि प्रवाशांमधील नाहीच. त्यामुळे या परीक्षेला अर्थच नसल्याचे रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रॅज्युएट
तरुणाचीही हजेरी
मुलुंड येथे राहणारा ३५वर्षीय नितीन नांदगावकर या ग्रॅज्युएट असलेल्या तरुणालाही रिक्षा परवान्याची लॉटरी लागली. अंधेरीला एका खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या नांदगावकर याला कमी पगार असल्याने रिक्षा चालवून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले. ही रिक्षा नाईटला चालवून अधिक पैसे कमविण्याचा विचार असल्याचेही तो म्हणाला.आजही परीक्षा घेणार
काही अमराठी उमेदवारांकडून परिच्छेद चांगल्या प्रकारे वाचला जात होता. त्याचे कारण विचारताच क्लास लावल्याची माहिती मिळाली. उमेदवारांची परीक्षा आमच्याकडून यशस्वीरीत्या घेण्यात आली. वडाळा आरटीओचे काही उमेदवार शिल्लक असून, त्यांची मंगळवारीही परीक्षा घेण्यात येणार आहे.
- संजय मेत्रेवार, वडाळा-उपप्रादेशिक परिवहन अधिकारीमी मूळचा उत्तर प्रदेशचा असून, मुंबईत मानखुर्द येथे राहतो. परवान्यासाठी मराठी भाषेची परीक्षा घेतली. ती योग्य असली तरी ज्यांना मराठी येत नाही त्यांना निदान हिंदी भाषेचा पर्याय ठेवायला हवा होता. अमराठी लोकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
- महेशकुमार राजभर, मानखुर्द