मुंबई - माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मालमत्तेचा लिलाव होईल. त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्राक्ट्रक्चर कंपनीने नाशिक मर्चंट सहकारी बँकेचे ४.३४ कोटी रुपये बुडवले आहेत. बँक कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करेल.पंकज व समीर हे दोघे आर्मस्ट्राँग इन्फ्राक्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत २००६ पासून संचालक आहेत. सत्यान केसरकर हे २०१० मध्ये कंपनीचे संचालक झाले. त्यानंतर या कंपनीने २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यात साखर कारखाना उभा केला. २०१५ मध्ये केंद्राच्या साखर निर्मिती धोरणांतर्गत कंपनीने ३.८६ कोटींचे कर्ज घेतले होते. या धोरणानुसार कर्जावरील व्याज पहिल्यावर्षी केंद्र भरणार होते. त्यानंतर चार वर्षाचे व्याज राज्य सरकार भरणार होते. पण कर्ज घेतल्यानंतरही कारखाना ठप्प झाल्याने कर्ज बुडित खात्यात गेले. आता व्याजासह वसुलीसाठी बँकेने लिलावाची नोटीस काढली आहे. या कंपनीच्या नावावरील ४२५० चौरस मीटर भूखंडासह त्यावरील ६०० चौरस मीटर कार्यालयाचाही लिलाव होईल.