सिद्धिविनायकाच्या अलंकारांचा पंधरा लाखांना लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:27 AM2017-12-26T06:27:51+5:302017-12-26T06:27:53+5:30
मुंबई : श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या अलंकारांच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासतर्फे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात सोमवारी लिलाव पार पडला.
अक्षय चोरगे
मुंबई : श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या अलंकारांच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासतर्फे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात सोमवारी लिलाव पार पडला. लिलावामध्ये तब्बल १०८ अलंकारांची १५ लाख ७५ हजार रुपयांना विक्री करण्यात आली. यामध्ये ७०.४४ गॅ्रम वजनाच्या चार बांगड्यांसाठी सर्वाधिक १ लाख ९० हजार रुपयांची बोली लावण्यात आली.
लिलावासाठी मांडलेल्या अलंकारांमध्ये मुकुट, बिस्किटे, नाणी, चिप, गणेशाच्या मूर्ती, लॉकेट्स, फुले, दूर्वा, हार, साखळ्या, बांगड्या, अंगठ्या, वळ, मोदक, माळा, उंदीर, भिकबाळी, ब्रेसलेट, पेंडट इत्यादी अलंकारांचा समावेश होता. एक ग्रॅम ते ७० ग्रॅम वजनाचे अलंकार यामध्ये होते. या लिलावामध्ये दोन किलो ३५९ ग्रॅम वजनाचे २२ ते २४ कॅरेटचे ४६१ अलंकार विक्रीसाठी मांडण्यात आले होते. यामध्ये ७०.४४ ग्रॅम वजनाच्या बांगड्या, ५३.६२० ग्रॅम वजनाचा मुकुट आणि ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट अशा विविध अलंकारांचा समावेश होता. ५० ग्रॅम वजनाच्या बिस्किटाला ३६ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावून एका भाविकाने विकत घेतले.
न्यासातर्फे सोमवारचा लिलाव हा या वर्षातला चौथा आणि शेवटचा लिलाव होता. या लिलावामध्ये २०१०-११ साली भाविकांनी अर्पण
केलेल्या अलंकारांची विक्री करण्यात आली.
सहा लाख भाविकांनी घेतले दर्शन
सध्या सर्वत्र नाताळचा फिव्हर आहे. २४ डिसेंबर रोजी साडे तीन लाख भाविकांनी आणि २५ डिसेंबर रोजी पावणे तीन लाख भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासतर्फे देण्यात आली आहे.
>४८ किलो सोने बँकेत
भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांपैकी ४८ किलो ८२५ ग्रॅम वजनाचे सोने पाच वर्षांसाठी मॉनिटायझेशन योजनेअंतर्गत बँकेत ठेवण्यात आले आहे.
>सुट्टीमुळे मुंबईकर मुंबईबाहेर आहेत. जे भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत, त्यामध्ये बहुसंख्य पर्यटक आहेत. त्यामुळे लिलावातून मोठी रक्कम प्राप्त झाली नाही. विक्री झालेल्या अलंकारांत लहान अलंकारांची संख्या जास्त आहे.
- संजीव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास
>लिलावासाठी मांडलेले अलंकार
कॅरेट दर्जा वस्तू वजन (ग्रॅम/मिलिग्रॅम)
२४ २२५ ७५८.८८०
२३ ६३ ३१६.०५०
२२ १५४ १२४६.२६०
१८ १८ ३८.३८०
एकूण ४६१ २३५९.४७०
यंदाचे लिलाव : २८ एप्रिल - १३ लाख ९५ हजार,
९ जुलै - ८ लाख ९० हजार, ८ आॅक्टोबर- ३८ लाख ५० हजार, २५ डिसेंबर- १५ लाख ७५ हजार (रुपयांत)