मुंबई : पॅनकार्ड क्लब घोटाळ्यातील १७३३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव पुढील महिन्यात होत आहे. या लिलावानंतर पॅनकार्ड क्लबधारकांची निम्म्याहून अधिक रक्कम ‘सेबी’ कडे येणार आहे.पॅनकार्ड क्लबच्या संचालकांनी राज्यातील ३५ लाख व देशभरातील ५० लाख गुंतवणूकदारांना आलिशान हॉटेल्स व रिसॉर्टमधील पर्यटनाचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक केली होती. २०१४ मध्ये हा घोटाळा उघड झाल्यानंतर ‘सेबी’ने कंपनीच्या देशभर पसरलेल्या ७०३५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली. यापैकी काही मालमत्तांचा दोन टप्प्यात लिलाव झाला आहे. त्याद्वारे २१२० व ७.९८ कोटी रुपये ‘सेबी’कडे आले आहेत. आता पुन्हा १७३२.४१ कोटी रुपयांच्या २० स्थावर मालमत्तांचा लिलाव २७ जूनला होत आहे.गुंतवणूकदारांची सर्व रक्कम परत करता यावी यासाठी ‘सेबी’ने कंपनीच्या संचालकांच्या आलिशान मोटारी, लॅपटॉप, दागिनेही जप्त केले होते. यापैकी १.३४ कोटी रुपयांच्या वाहनांचा लिलाव ८ जूनला होत आहे. त्यामध्ये मर्सिडीज, ह्युंदाई, टोयोटा या कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे.रक्कम परत कधी मिळणार?याआधीचे दोन लिलाव व आता पुढील दोन लिलावाद्वारे या घोटाळ्यातील ३८६० कोटी रुपयांची रक्कम मोकळी होणार आहे. पण ही सर्व रक्कम गुंतवणूकदारांना परत कधी मिळणार, हे ‘सेबी’ने स्पष्ट केलेले नाही. काही लिलाव रेडी रेकनरपेक्षाही कमी दरात झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आहे. यासंबंधीच्या बैठकीत ३०० कोटी रुपये रक्कम जमा झाल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे परत केले जातील, असे ‘सेबी’कडून एप्रिल महिन्यात सांगण्यात आले होते. पण अद्याप त्याबाबत कुठल्याच हालचाली नाहीत.
‘पॅनकार्ड क्लब’च्या १,७३३ कोटींच्या मालमत्तांचा पुढील महिन्यात लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:39 AM