मुंबई: थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. या कारवाई अंतर्गत ११ हजार ६६१ ठिकाणी सील करण्यात आले आहे. तर ४७९ ठिकाणी जलजोडणी खंडित, काही ठिकाणी वाहन व कार्यालयातील वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच महापालिकेचे २१० कोटी थकविणाऱ्या ४२ भूखंडांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.मालमत्ता कराच्या माध्यमातून सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात पाच हजार दोनशे कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. यापैकी आतापर्यंत तीन हजार आठशे कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी अद्याप महापालिकेला १४०० कोटी रुपये येणे आहे. त्यानुसार थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यात आली होती. मुदतीत थकीत रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारांची जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने - वातानुकूलन यंत्रणा यासारख्या महागड्या वस्तू जप्त करण्यात येत आहेत.
वाहन, कार्यालयातील साहित्य जप्त- वांद्रे पूर्व परिसरातील मे. एमआयजी सहकारी गृहरचना संस्थेकडे (विकासक मे. डी.बी. रिऍलिटी) ६६ कोटींची थकबाकी आहे. मात्र नोटीस बजावूनदेखील मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकाचे वाहन जप्त करण्यात आले आहे. तर वांद्रे पूर्व परिसरातील एका बहुमजली इमारतीत मे. - महाराष्ट्र थिएटर प्रा. लि.(मे. आर एन ए काॅर्पोरेट) यांचे कार्यालय आहे. त्यांची २१ कोटींची थकबाकी असल्याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरील कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अखत्यारीतील तळमजल्यावर सील करण्यात आले.
यांनी थकविले पैसेकारवाईअंतर्गत मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी ४२ भूखंडांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मे. सुमेर असोसिएटर यांच्याकडे ५३. ४३ कोटी, मे. सुमेर बिल्डर प्रा . लि कडे २९.७१ कोटी, मे.लोखंडवाला कोठारीया - १३.५५ कोटी, वंडरव्हॅल्यू रियलिटी डेव्हलपर लिमिटेडकडे १४. ६५ कोटी थकित आहेत.