'ऑडी'वाल्याची मग्रुरी, ओला ड्रायव्हरशी दादागिरी! डोक्यातली हवा कुणी काढेल का? 'धडक' शिक्षा होईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:05 PM2024-08-31T15:05:09+5:302024-08-31T15:16:13+5:30

ओला चालकाच्या जागी जर एखादी महागडी कार असती तर त्यासोबतही अशाच असंवेदनशीपणे ऑडी कार चालक वागला असता का?

Audi owner lifts and slams Ola driver to ground over minor accident strict action demand | 'ऑडी'वाल्याची मग्रुरी, ओला ड्रायव्हरशी दादागिरी! डोक्यातली हवा कुणी काढेल का? 'धडक' शिक्षा होईल का?

'ऑडी'वाल्याची मग्रुरी, ओला ड्रायव्हरशी दादागिरी! डोक्यातली हवा कुणी काढेल का? 'धडक' शिक्षा होईल का?

मुंबई

मुंबईत ओला कॅब चालकाला एका ऑडी कारवाल्यानं जबर मारहाण केल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ऑडी कारला धक्का लागला म्हणून कार मालकाचा राग इतका अनावर झाला की त्याने ओला चालकाला थप्पड लगावली, खांद्यावर उचलून खाली आपटलं आणि नंतर लाथाही मारल्या. हे सगळं त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. यात कॅब चालकाला जबर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल करावं लागलं. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय आणि एफआयआरही दाखल केलाय. पण, या व्हिडीओच्या निमित्ताने पैशांचा माज, श्रीमंतीची मग्रुरी आणि गरिबावर दादागिरी करण्याची वृत्ती हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण, व्हिडीओत जे दिसतं, त्याच्या आधी जे घडलंय, तेही तितकंच गंभीर आहे. 

ऑडीसारख्या महागड्या कारला एखादा स्क्रॅच जरी आला तरी मालकाच्या काळजात चर्रर्र होणं स्वाभाविक आहे. इथे तर त्या ओला कॅबवाल्याने ऑडीला मागून चक्क धडक दिलीय. त्यामुळे कार मालकाची 'सटकली', तर चुकलं काय, असं व्हिडीओ पाहून काही जणांना वाटू शकतं. पण, आधी ऑडी मालक ऋषभ चक्रवर्तीने याच ओला कॅबला धडक दिली होती आणि त्याची नुकसान भरपाई घेण्यासाठीच ओला चालक कैमुद्दिन कुरेशी ऑडीच्या मागे आला होता, हे कळलं तर आपलाही दृष्टिकोन बदलेल.  

नेमकं काय घडलं?
आता ही नेमकी काय घटना होती ते जाणून घेऊयात. ज्यानं मारहाण केली त्याचं नाव आहे ऋषभ चक्रवर्ती घाटकोपरच्या पार्कसाइट येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारा तरुण. तर ज्याला मारहाण झाली त्या ओला चालकाचं नाव आहे कैमुद्दीन कुरेशी. २४ वर्षीय कैमुद्दीन याच्या ओला कॅबला ऑडी चालक ऋषभ यानं आधी धडक दिली होती. या धडकेत कैमुद्दीन याच्या कारचं नुकसान झालं होतं. त्याची भरपाई देण्यास ऑडी चालक काही तयार झाला नाही. त्यामुळे कैमुद्दीन यानं ऋषभ याचा पाठलाग केला. ऋषभ याची कार त्याच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आली. त्यापाठोपाठ ओला कारचालक देखील पोहोचला. यावेळी ऋषभच्या ऑडीला ओला कारचालकाचा धक्का लागला. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. ऋषभ यानं कारमधून खाली उतरुन ओला कारचालकाच्या कानशिलात तर लगावलीच पण कसलाही विचार न करता थेट उचलून आपटलं. यात ओला चालकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. ओला कारच्या नुकसान भरपाई तर सोडाच कैमुद्दीनवरच रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली. ऋषभ यानं घटनास्थळावरुन पळ काढला.

डोक्यातली हवा कोण काढणार?

या घटनेनंतर काही प्रश्न मनात उपस्थित होतात. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न, ही मुजोरी मोडून कशी काढायची, हाही आहे.

१. ऑडीला धक्का लागला, तर तुम्हाला राग येतो. मग, तुमच्या ऑडीने ओला कॅबला धक्का दिला, तेव्हा ऋषभ चक्रवर्तीला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली नाही का? की ऑडीपुढे त्याच्या कारला काही किंमतच नाही?  

२. ओला चालकाच्या जागी एखाद्या महागड्या कारचाच धक्का लागला असता आणि तो मालकही श्रीमंत असता, तर ऋषभने त्यालाही अशीच थप्पड मारून उचलून आपटलं असतं का?

३. ओला कॅब चालकाची चूक होतीच, हे मानलं तरी कायदेशीर मार्गाने त्याच्यावर कारवाई करता आली नसती का? कायदा हातात घेऊन अशा पद्धतीने मारहाण करणं कितपत योग्य आहे? 

४. नुकसानभरपाई घेऊन विषय मिटवता आला नसता का?

५. हा पैशांचा माज नाही तर दुसरं काय म्हणायचं? आता या मग्रुरीला पोलीस कायद्याचा हिसका दाखवणार का?

घटनेचा व्हिडिओ-

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी ऑडी कार चालकावर गुन्हा देखील दाखल झालाय. पोलीस या प्रकरणाची चौकशी करताहेत. ऑडी कारचालकाला नोटीसही पाठवण्यात आली आहे. पण ओला कारचालकावर ओढवलेल्या संकटाचं काय? घरचा एकुलता एक कमावता माणूस जर घरी बसला तर कुटुंबाचं पोट भरणार कोण? त्यामुळे गरिबाकडे दुबळेपणाच्या चष्म्यातून पाहणाऱ्या अशा सो कॉल्ड उच्चभ्रू व्यक्तीवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. जेणेकरून अशांच्या नाकावरच्या श्रीमंतीचा चष्मा खाली उतरेल, डोक्यातली हवा निघेल आणि पुन्हा अशा घटना होणार नाहीत.
 

Web Title: Audi owner lifts and slams Ola driver to ground over minor accident strict action demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.