प्रवेशाचे आॅडिट म्हणजे निव्वळ सोपस्कार : ‘सिसकॉम’चा आरोप
By admin | Published: July 5, 2017 04:51 AM2017-07-05T04:51:55+5:302017-07-05T04:51:55+5:30
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून प्रवेश प्रक्रियेचे आॅडिट करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र योग्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून प्रवेश प्रक्रियेचे आॅडिट करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र योग्य पद्धतीने आॅडिट झाले नसून आॅडिटचा
बनाव करण्यात आल्याचा आरोप सिस्टम करेक्टिंग मूव्हमेंट (सिसकॉम)ने केला आहे.
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे आॅडिट स्वतंत्र संस्थेमार्फत करण्याचा निर्णय शासनाने दिला होता. या आॅडिटचा अहवाल शिक्षण विभागाने जाहीर करणे अपेक्षित होते. पण, हा अहवाल सादर केला गेला नसल्याने माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आला. पण, ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे सिसकॉमचे म्हणणे आहे. आॅडिट करण्यासाठी स्वतंत्र संस्था नेमण्यात आली नव्हती.
आॅडिट करण्याचे निकष ठरवण्यात आल्याचे दिसून आले नाही. तपासणी पूर्व, तपासणी दरम्यान आणि तपासणी नंतरच्या गटात कुठल्याही बैठका झाल्याचे आढळून येत नाही. मुंबईमध्ये प्रवेश प्रक्रिया संपल्यावर पथकामधील सदस्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयांना भेटी दिल्या होत्या. दिलेल्या अहवालात अकरावी प्रवेशासाठी विभाग माध्यमानुसार, व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा अशा राखीव जागांची माहिती आणि आलेल्या अर्जांची माहिती देण्यात आलेली नाही.
अकरावीच्या प्रवेशात माहिती पुस्तिकेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येते. त्यातून
प्रवेश प्रक्रियेसाठी खर्च केला जातो. पण, याचा हिशोब कुठेही ठेवल्याचे दिसून आले नाही. जमा-खर्चाची तपासणीही आॅडिटमध्ये केली नसल्याचा आरोप सिसकॉमतर्फे करण्यात आला आहे.