मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून ही कोंडी सोडवण्यासाठी आखलेल्या विविध प्रकल्पांचं काम दिरंगाईने सुरू आहे. या दिरंगाईमुळे या प्रकल्पांची किंमत जवळपास दुपटीने वाढली आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पांच्या खर्चांचं ऑडिट करा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसने केली आहे. प्रकल्पांमध्ये मुद्दाम दिरंगाई करून खर्च वाढवण्याचा हा प्रकार संगनमताने तर होत नाही ना? असा सवालही मुंबई काँग्रेसने उपस्थित केला आहे.
मुंबईतील कोंडी सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार असताना अनेक प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला होता. यात गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता, दहिसर-भाईंदर उन्नत रस्ता, सागरी किनारा मार्ग, विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल, अशा प्रकल्पांसह रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचाही समावेश होता. मात्र शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना इतर पक्षांमधील नेते फोडण्याशिवाय इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळच मिळत नसल्याने हे प्रकल्प रखडले आहेत, अशी टीका मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी याआधी ६३०१ कोटी रुपये खर्च येणार होता. यात दुपटीने वाढ झाली असून ही रक्कम १२०१३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्याशिवाय दहिसर-भाईंदर उन्नत रस्त्याचा १९८१ कोटी रुपयांचा खर्च ३३०४ कोटींवर पोहोचला आहे. सागरी किनारा मार्गाच्या खर्चातही एक हजार कोटींनी वाढ झाली आहे. तर विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलासाठी जिथे ३७ कोटी रुपये लागणार होते, तिथे आता ९५ कोटी खर्च येणार आहे. हे सर्व पैसे सर्वसामान्यांच्या खिशातून म्हणजे सरकारी तिजोरीतूनच जाणार आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
याचबरोबर, महाविकास आघाडी सरकार असताना कोरोना काळातही या सर्वच प्रकल्पांना आम्ही गती दिली होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून या सर्व प्रकल्पांना खिळ बसली आहे. सरकारने या प्रकल्पांकडे लक्ष देण्याऐवजी थातुरमातूर रंगरंगोटी आणि रोषणाई यांवर १७०० कोटी रुपयांची नासाडी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार यांच्या फोडाफोडी सरकारकडे शाश्वत विकासाचं व्हिजनच नसल्याची टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
या सर्व प्रकल्पांचे खर्च का वाढले, याचं ऑडिट होण्याची गरज आहे. त्यातूनच खरी बाब लोकांसमोर येईल. त्यामुळे या प्रकल्पांचं ऑडिट व्हावं, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसने केली आहे. मुंबईकरांना दर दिवशीच्या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. पण तेच पूर्ण होत नसतील, तर हे सरकार मुंबईकरांना तरी उत्तरदायी आहे की नाही, असा खरमरीत सवालही वर्षा गायकवाड यांनी केला आहे.