मुंबई : भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरातील पालिका रुग्णालय, दवाखाने आणि आऱोग्य केंद्रांचे पाहणी केली असता या रुग्णालयांमध्ये दरवर्षी अग्निरोधक यंत्रणा व इलेक्ट्रिक यंत्रणांचे ऑडिट केले जाते. याविषयी, मुख्यतः संपूर्णतः कोविड रुग्णालय असलेल्या नायर रुग्णालयात पाहणी केली असता कोरोनाच्या काळात सहा महिन्यांनी ऑडिट करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
नायर रुग्णालयात मंगळवारी पाहणी केली असता या आवारात कुठेही उघड्यावर वायरिंग नसल्याचे दिसून आले आहे, याखेरीज रुग्णालयात अग्निसुरक्षा, ऑडिट आणि तपासणी होत असल्याचे रुग्णालय अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ हा कायदा सर्व सार्वजनिक आस्थापनांना लागू झाला, त्यामुळे या कायद्यानुसार फायर ऑडिट वर्षातून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये बंधनकारक आहे. ते केल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे पालिका प्रशासनाला सादरही केले जाते.
पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, गुजरात येथील कोरोना केंद्रात आगीची दुर्घटना घडल्यानंतर गेल्या वर्षीच्या मध्याला पालिकेच्या सर्व कोरोना केंद्रात आणि रुग्णालयातील अग्निसुरक्षेची पडताळणी कऱण्यात आली होती. त्याचप्रमाणे जम्बो कोविड केंद्रामध्ये दर महिन्याला प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अग्निसुरक्षेची तपासणी केली जाते.
सरकारी यंत्रणेवर विश्वास
- दुर्गा खामकर
गेली अनेक वर्षे त्वचेच्या आजारांवर उपचार घेत आहेत. त्यामुळे कमी पैशांमध्ये या रुग्णालयात उपचार मिळत आहेत. आता साठी ओलांडलेली असली तरीही डॉक्टर आणि परिचारिका काळजी घेतात. खासगी रुग्णालयात उपचार परवडत नसल्याने सरकारी यंत्रणेवरच विश्वास आहे.
धाकधूक असतेच
- अनिरुद्ध देशमुख
माझ्या सात वर्षांच्या नातवावर गेले अडीच महिने उपचार सुरू आहेत. मात्र भंडारासारख्या घटना घडल्या की रुग्णालयाची पायरी चढायची भीती वाटते. कायमच धाकधूक राहते की असे काही आपल्याबाबत घडायला नको, मात्र मध्यम वर्गातील असल्याने पालिका-सरकारी रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.