मुंबई : ऑगस्ट महिन्यात जवळपास १५ लाख मुंबईकरांनी हवाई प्रवासाचा आनंद लुटला. दुसरी लाट ओसरल्यानंतर मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येचा आलेख सातत्याने उंचावत असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चौपट वाढ नोंदविण्यात आली आहे.
मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये १५ लाख ८७ हजार १५० प्रवाशांची नोंद करण्यात आली. त्यापैकी १४ लाख २ हजार ३६९ प्रवाशांनी देशांतर्गत, तर १ लाख ८४ हजार ७८७ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास केला. मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या प्रवाशांची संख्या ७ लाख ८५ हजार ४७९ नोंदविण्यात आली, तर ८ लाख १ हजार ६७७ प्रवासी विविध विमानतळांवरून मुंबईत दाखल झाले.
दिल्ली, बंगळुरू आणि गोवा या मार्गांवर सर्वाधिक प्रवाशांनी ये-जा केली. दिल्लीवरून २ लाख ४२ हजार ८५, बंगळुरू १ लाख ११ हजार २६, तर गोव्यातून ९५ हजार ८९ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल झाले. आतंरराष्ट्रीय ठिकाणांचा विचार करता दोहाला मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती दर्शवली. या काळात ४१ हजार ४१० प्रवाशांनी दोहा-मुंबई-दोहा प्रवास केला. त्या खालोखाल दुबई ३७ हजार १२६, तर मालेहून १८ हजार १९० प्रवासी मुंबईत दाखल झाले. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाने सर्वाधिक प्रवाशांना सेवा दिली.
......
‘वीकेंड’ला वाढता प्रतिसाद
- रक्षाबंधन, गोपाळकाला आणि ओणम हे मोठे सण ऑगस्ट महिन्यात होते. त्यामुळे या काळात वीकेंडला हवाई प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली.
- ऑगस्टमध्ये वीकेंडला गोव्याला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक २२ हजार ७८ इतकी नोंदविण्यात आली. त्याखालोखाल श्रीनगर आणि लेहला प्रवाशांची पसंती दिसून आली.
- येत्या काळातही हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा मुंबई विमानतळ प्रशासनाने व्यक्त केली.