लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऑगस्ट महिन्यातील कमाल तापमानानेमुंबईकरांना घाम फोडला असून, २२ ऑगस्ट सर्वात ‘हॉट’ दिवस ठरला आहे. या दिवशी २२ ऑगस्ट रोजी सांताक्रुझ वेधशाळेमध्ये कमाल तापमानाची नोंद ३३.७ अंश एवढी झाली आहे.
तत्पूर्वी सर्वाधिक कमाल तापमान १८ ऑगस्ट रोजी ३३.६ अंश एवढे नोंदवण्यात आले होते, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरकडून देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री दहानंतर उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे, विद्याविहार, साकीनाका परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी मात्र पाऊस नेहमीप्रमाणे गायब झाला.
सकाळसह दुपारी कडाक्याचे ऊन पडले होते. पण, दुपारी अडीचनंतर उपनगरात घाटकोपर, विद्याविहार, सायन, कुर्ला परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पट्ट्यात पाऊस कोसळत असतानाच बीकेसी, वांद्रे, माहिमपासून शहरातला अनेक भाग कोरडा होता. पण सायंकाळी ६ वाजल्यानंतर काही भागात पावसाने हजेरी लावली असली, तरी रात्री पुन्हा पाऊस गायब झाला.
आर्द्रता वाढली होती. कमाल तापमानही वाढले होते. शिवाय हवामान ढगाळ होते. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा जाणवत होता. आता शनिवार, रविवारी पावसाची शक्यता आहे. दोन दिवसांत १०० मिमी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मुंबईतला उकाडा कमी होईल.- राजेश कपाडीया, वेगरिज ऑफ दी वेदर