मुंबई : किराणा सामान खरेदी करण्यासाठी दिलेल्या ५० रुपयांपैकी १० रुपये चॉकलेटवर खर्च केल्याने सात वर्षांच्या भाचीला चटके देणाऱ्या मावशीची उच्च न्यायालयाने मंगळवारी जामिनावर सुटका केली.
अर्जदार गेली चार वर्षे कारागृहात आहे. तरीही खटला सुरू झालेला नाही. ती सात वर्षाच्या मुलीसह कारागृहात आहे. अर्जदाराच्या कारावासाच्या कालावधीचा विचार करता तिला आणखी काही काळ कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे न्या. एस. जी. डिगे यांच्या एकलपीठाने म्हटले. तपास झाला आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने अर्जदाराला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे नमूद करीत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, अर्जदार साडेचार वर्षे कारागृहात आहे. तिच्याबरोबर तिची सात वर्षांची मुलगीही कारागृहात आहे. त्याशिवाय अन्य तीन अल्पवयीन मुलींची जबाबदारीही तिच्यावर आहे. त्यामुळे तिचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा.
नेमके प्रकरण काय?
२८ सप्टेंबर २०२० रोजी आरोपी वंदना काळेने तिच्या भाचीला किराणा खरेदीसाठी ५० रुपये दिले होते. भाचीने चॉकलेटसाठी त्यातील १० रुपये खर्च केले. त्यामुळे वंदनाने भाचीचे हातपाय बांधले.
तोंडात रुमाल कोंबला आणि तिच्या खासगी भागावर, मांडीवर तेल ओतले, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. . मुलीच्या शरीरावर जखमा असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी तिच्या काकीकडे केली.
काकीने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मावशीवर आयपीसी, पॉक्सो आणि ज्यवेनाईल जस्टिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने अर्जदाराला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे नमूद करीत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.